सातारा : उन्हाळ्याची चाहूल लागताच पालिकेकडून पाणीबचतीचे नियोजन केले जाते. नागरिकांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न केले जातात. तरीही अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यव करतात, अशा नागरिकांना यापुढे गुलाबपुष्प भेट देऊन ‘पाणी वाचवा’ असा संदेश दिला जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती सीता राम हादगे यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहरात चाळीस प्रभाग असून, तब्बल १२ हजार ७०० नळकनेक्शन आहेत. जवळपास सव्वालाख लोकसंख्येला पालिका कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करते. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, कास तलावाची पाणीपातळी खालावते. त्यामुळे पालिकेला पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागतो. नागरिकांना टंचाईची झळ बसू नये यासाठी पालिका प्रयत्न करीत असताना अनेक नागरिक पाण्याचा वारेमाप उपयोग करतात. दररोज सकाळी प्रभागांना अचानक भेटी देऊन पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांना गुलाबपुष्प भेट देऊन त्यांना पाणीबचतीचे महत्त्व पटवून देणार आहे.
नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविणार असल्याचे सभापती सिता हादगे यांनी पत्रकात नमूद केले आहे.