कोरेगाव : ‘जिल्हा प्रशासनाकडून सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांवर अन्याय होत आहे. लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत फेरविचार न केल्यास, बुधवारपासून आंदोलन छेडण्याच्या भूमिकेत आहोत,’ असा इशारा विविध व्यापारी संघटनांनी दिला आहे.
व्यापाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस प्रशासनाने सोमवारी सकाळीच व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापारी आपल्या भूमिकेवर ठामच राहिले. त्यानंतर सायंकाळी पुन्हा व्यापाऱ्यांची बैठक झाली. सुनील खत्री, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, सुरेश कुलकर्णी, श्रीकांत मर्दा, संतोष नलावडे, राजेश दायमा, पृथ्वीराज बर्गे यांच्यासह व्यापाऱ्यांनी जाऊन प्रांताधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन सादर करून, अन्यायकारक लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी केली. या वेळी झालेल्या चर्चेत पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे व नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी भाग घेतला.