सातारा : पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीशी फलटण शहर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल उदय नारायण जाधवचे लागेबांधे असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्याला तत्काळ निलंबित केले. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. खंडाळा तालुक्यातील वीर धरणाजवळ फिरायला आलेल्या शहा कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दिलीप गोरख माळी (वय २७), विजय वसंत चव्हाण (२९), लखन नाना जाधव (२५), रिझवान महमंदइलीस खान (२७, सर्व रा. संतोषी माता मार्ग, संगुणामाता नगर मलटण, ता. फलटण) यांना गुन्हे शाखेने रविवारी अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस आली. फलटण शहर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल उदय जाधव (मूळ रा. आसनगाव, ता. कोरेगाव) हा या आरोपींना सहकार्य करत होता. ही बाब चौकशीतून उघड झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी जाधवला तत्काळ निलंबित केले; परंतु जाधवने आरोपींना नेमके कसे सहकार्य केले, हे अद्याप समोर आले नाही. त्याचा शोध पोलीस अधिक सखोलपणे करीत आहेत. (प्रतिनिधी)
लुटारूंशी लागेबांधे; पोलीस निलंबित
By admin | Updated: July 16, 2014 01:07 IST