सातारा : साताऱ्यात नव्याने केलेले रस्ते पुन्हा खोदायला सुरुवात झाली आहे. जीवन प्राधिकरण आणि नगरपालिका प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याने रस्त्यांसाठी केलेला खर्च पाण्यात जाण्याची वेळ आली आहे.गेल्या वर्षी सातारकरांना संपूर्ण पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यांतून जावे लागले. रस्त्यांवर तात्पुरती मलमपट्टी करून खड्डे भरले जात होते. अनेकवेळा नागरिकांना रस्त्यांसाठी आंदोलनेही करावी लागली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरामध्ये काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू झाली. मात्र, पुन्हा आचारसंहिता लागल्याने रस्त्यांची कामे रखडली गेली; परंतु निवडणूक झाल्यानंतर रस्त्यांच्या कामांना वेग आला. शहरातील मुख्य रस्ते आणि पेठांमध्येही बऱ्यापैकी रस्ते चकाचक होत नाही तोपर्यंत प्राधिकरणाने नवे रस्ते केलेले खोदण्यात सुरुवात केली. त्यामुळे नवीन रस्ते केलेल्याचा खर्च पाण्यात जात आहे.वास्तविक, नवीन रस्ते तयार करण्यापूर्वी पाईपलाईन अथवा दूरध्वनी केबल वायरची कामे करणे क्रमप्राप्त होते. परंतु, ठेकेदारीमध्ये सर्वस्व पणाला लावलेल्या काही मूठभर अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण होत आहे. नागरिकांनी कर रूपाने दिलेले पैसे असे डोळ्यांदेखत या ना त्या कारणाने खर्च होत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी नेमके काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जीवन प्राधिकरण म्हणतेय पालिकेचे काम सुरू आहे. अन् पालिका म्हणतेय जीवन प्राधिकरणचे काम सुरू आहे, अशा प्रकारची एकमेकांवर टोलवाटोलवी करण्यापलीकडे अधिकाऱ्यांकडून काहीच होत नाही. वास्तविक, छोटे-मोठे लिकेज असेल, तर ते काढणे भागच आहे. परंतु, त्यासाठी नागरिकांना वेठीस कशासाठी धरले जाते. दर दोन महिन्यांने काही ना काही रस्त्यांमध्ये खोदकाम सुरूच असते. या दोन्ही विभागांना खरोखरच कामे करायची आहेत की, आलेला निधी खर्च करण्यासाठी रस्ते खोदायचे आहेत, याविषयी शंका उपस्थित करण्यासारखे आहे. सर्वसामान्य नागरिक मात्र रस्ता खोदलाय म्हणून दाद कोणाकडे मागायची, आपले काम भले आणि आपण, अशी मानसिकता ठेवून लोक रस्त्यांच्या खोदकामाकडे कानाडोळा करतायत; परंतु अधिकारी मात्र शासनाकडून आलेला मलिदा लाटण्यासाठी दिवसरात्र रस्ते खोदतायत, अशी स्थिती सध्या सातारा शहरात दिसत आहे. (प्रतिनिधी)गळती एकीकडे दुरुस्ती दुसरीकडे..दोन दिवसांपूर्वी राजवाडा परिसरामध्ये नवीन रस्ता खोदण्यात आला. पाईपची दुरुस्ती करण्यासाठी म्हणे, हा रस्ता खोदण्यात आला होता; परंतु रस्ता खोदणाऱ्या कर्मचाऱ्यांना गळती काही सापडेना. त्यामुळे त्यांनी तब्बल तीन ठिकाणी रस्ता खोदला, तरीही त्यांना गळती काही सापडले नाही.अखेर आणखी एक खड्डा खणला, त्यावेळी त्यांना ही गळती सापडली. अशा पद्धतीने जर शहरातील रस्त्यांची कामे केली गेली तर एकही रस्ता खड्ड्यांशिवाय दिसणार नाही.
रस्ते केले पण ‘पाण्यात’ गेले!
By admin | Updated: December 26, 2014 23:56 IST