आॅनलाईन लोकमतकुसूर (सातारा) : कऱ्हाड तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात डोंगर पायथ्याला वसलेल्या बामणवाडीसह परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये गत एक महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आठ दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी सोडले जात असल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष घालून या भागातील गावांना तत्काळ टँकर सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.बामणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बामणवाडी, चाळकेवाडी, खड्याचीवाडी एक, शिबेवाडी-कारंडेवाडी एक आणि पवारवाडीसाठी एक अशा तीन गाव विहिरीद्वारे या सहा वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मात्र, या वाड्या डोंगर पायथ्यालगत वसल्या असल्याने व पूर्णत: डोंगरी विभाग असल्याने कायमस्वरूपी या विहिरींना जिवंत पाणी स्त्रोत नाहीत. प्रत्येकवर्षी फेबु्रवारी, मार्चअखेर विहिरींचा जलसाठा कमी होऊन पाणीटंचाई निर्माण होत आहे.गत महिन्यापासून पवारवाडी आणि शिबेवाडी, कारंडेवाडी या वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्हीही विहिरींचा पाणीसाठा संपुष्टात आल्याने दहा ते बारा दिवसांतून एकदा पाणी सोडण्यात येत आहे. तर बामणवाडी, चाळकेवाडी आणि खड्याचीवाडी या वाड्यांना पाच ते सहा दिवसांतून एकदा पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, हे पाणी फक्त पिण्यासाठी दोन दिवस ही पुरत नसल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे.पिण्याच्या पाण्यासह जनावरांना, खचार्ला लागणारे पाणी मिळविण्यासाठी लोकांना बोअरवेल, आडावरती तासन्तास घागरभर पाण्यासाठी थांबावे लागत आहे. बोअरवेल व आडांमध्येही अल्प पाणीसाठा असल्याने पाणी साठेपर्यंत थांबावे लागत आहे. परिणामी रात्रंदिवस पाण्यासाठी रांगा लावल्या जात असून, नंबरावरून अनेकदा भांडणे लागल्याचे प्रकार घडत आहेत.बामणवाडी परिसर हा पूर्णत: भौगोलिकदृष्ट्या तिन्ही बाजूंनी वेढलेल्या डोंगर पायथ्याशी वसलेला आहे. परिणामी या परिसरात कायमस्वरूपी पाणी उपलब्धतेसाठी नदी किंवा पाझर तलाव नसल्याने विहिरींची पाणी पातळी फेब्रुवारीअखेरच संपुष्टात आली आहे.बामणवाडी आणि कारंडेवाडी येथे तलाव बांधण्यात आले आहेत. मात्र, या दोन्हीही तलावांना सुरुवातीपासूनच मोठी गळती असल्याने सप्टेंबर, आॅक्टोंबरअखेर तलावातील संपूर्ण पाणी संपुष्टात येते. परिणामी असून अडचण अन् नसून खोळंबा अशी अवस्था निर्माण झाली आहे.बामणवाडी परिसरात गत अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाणीटंचाई परिस्थिती निर्माण होत असल्याने अनेक लोकांनी पाण्यासाठी बोअरवेल मारून पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक बोअरवेल तीनशे फूट खोल जाऊनही नुकताच धुरळा उडाला तर काही बोअरवेलला गतवर्षी पाणी आले होते. (वार्ताहर)
पाण्याच्या थेंबासाठी फिरावं लागतंय वणवण
By admin | Updated: March 21, 2017 16:43 IST