सातारा : ‘माझा विरोध असतानाही पक्षाच्या काही लोकांनी कोऱ्या कागदावर माझा राजीनामा घेतला आहे. या कागदावर राजीनाम्याचे लिखाण नियम धाब्यावर बसवून बोगसरीत्या करण्यात आले आहे,’ असा गौप्यस्फोट जिल्हा परिषदेचे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. अवमानकारकरीत्या पदावरून काढून टाकण्याच्या या क्लेशदायक निर्णयाविरोधात योग्य ठिकाणी अपील करणार असल्याचेही शिंदे यावेळी स्पष्ट केले. जिल्हा परिषद अध्यक्षांनी पदाचा राजीनामा मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे म्हणाले, ‘राष्ट्रवादी पक्ष संघटनेत मी अनेक वर्षांपासून निष्ठेने काम केले आहे. मी अध्यक्षपदासाठी दावेदार असताना मला डावलण्यात आले होते. कृषी सभापतीपद देऊन माझी बोळवण करण्यात आली. या पदावरही निष्ठेने काम केले. पक्ष बळकटीसाठी प्रयत्न केले. मात्र, याच पक्षात काही लोक मिळून भूमिका ठरवितात, हे आता स्पष्ट झालेले आहे. पक्षाचे पदाधिकारीही संघटना ज्यांनी मजबूत केली, त्या लोकांशी संवाद ठेवत नाहीत. संघटनेत काम करीत असताना योग्य काम करणाऱ्याचे कोणी तरी ऐकून घ्यायला हवे. मात्र, तेही आता होताना दिसत नाही.’पक्षामध्ये राजीनामा देण्याबाबत चर्चाही झाली नसताना अचानकपणे अध्यक्षांनी गाड्या जमा करण्याचे पत्र आपल्याला दिले. राजीनामा घेणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर ३ मार्चला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना आपण स्वत: नोटीस पाठविली असून, त्याची पोहोचही आपल्याजवळ असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांच्या गौप्यस्फोटामुळे राष्ट्रवादीतील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे. (प्रतिनिधी)अवमानकारकरीत्या पदावरून पायउतार केल्याप्रकरणी येत्या दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार आहे. कोऱ्या कागदावर सह्या घेऊन त्यावर राजीनामा पत्र तयार केले गेले आहे. तसेच सभापतींसमोर उपस्थित असताना त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले असल्याने याबाबत योग्य ठिकाणी दाद मागणार असल्याचेही शिवाजीराव शिंदे यांनी सांगितले.आम्हाला पदाचा ताम्रपट मिरवायचा नव्हता. मात्र, ज्या अवमानकारक पद्धतीने आमचे राजीनामे घेतले गेलेत, ते मनाला लागले आहे. पक्षाने आमच्या निष्ठेची हीच का किंमत केली?- शिवाजीराव शिंदे, सभापती कृषी समिती
कोऱ्या कागदावर घेतला सभापतिपदाचा राजीनामा!
By admin | Updated: March 8, 2016 00:42 IST