फलटण : गुणवरे येथील ब्लूम इंग्लिश मीडिअममधील तिसरीतील विद्यार्थ्याने ८७ किलोमीटरचे अंतर २ तास ३२ मिनिटांत पार करताना त्यामधील घाट रस्ता सहज पार करून सायकलिंगच्या क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
गुणवरे येथील ब्लूम इंग्लिश मीडिअम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या विद्यालयात इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत असलेल्या श्रीराम लहू आडके, रा. शेरेवस्ती, मठाचीवाडी, ता. फलटण या विद्यार्थ्याने नुकतेच मठाचीवाडी ते शिखरशिंगणापूर व परत असे सुमारे ८७ किलोमीटरचे अंतर २ तास ३२ मिनिटांत सायकलने प्रवास करून पार केले. या प्रवासादरम्यान शिंगणापूर ते कोथळे हा घाट रस्त्याचा प्रवास फक्त १७ मिनिटांत पूर्ण केला. यासाठी त्याचे आई-वडील व आजोबा सुरेश आडके यांनी त्याला प्रोत्साहित केले. ईश्वरकृपा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे, सचिव साधनाताई गावडे, पुणे प्रादेशिक उपविभागाचे वाहन निरीक्षक संभाजीराव गावडे, प्राचार्य संदीप किसवे यांनी कौतुक केले.