कऱ्हाड : शहरातील घराघरात सर्व्हे करणाऱ्या नागरी आरोग्य केंद्राच्या आशा सेविकांना टोपी, मास्क, सॅनिटायझर व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप झाले. जिमखाना संस्थेचे संजीवनी मेडिकल, डे-नाईट केमिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने हे किट देण्यात आले. मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, सुधीर एकांडे, जयंत बेडेकर उपस्थित होते.
ढगाळ वातावरण
कऱ्हाड : गत काही दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. दररोज दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर ढगांचा गडगडाट होतो. तसेच पावसाची चिन्हे निर्माण होतात. काहीवेळा ठिकठिकाणी वळीव पाऊस हजेरी लावतो. तर अनेक ठिकाणी पाऊस हुलकावणी देतो. वळवामुळे शेतकऱ्यांना सध्या दिलासा मिळाला आहे.
रस्त्यावर शुकशुकाट
कऱ्हाड : लॉकडाऊनमुळे शहरातील प्रमुख रस्ते पोलिसांनी रोखले आहेत. कोल्हापूर नाका ते पोपटभाई पटेल पेट्रोल पंप, भेदा चौक, विजय दिवस चौक मार्गे कृष्णा कॅनॉलकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. शहरातील इतर रस्त्यांवर मात्र मोठ्या प्रमाणावर शुकशुकाट जाणवत आहे.
पोलिसांना मदत
पाटण : कोरोना काळातही पोलीस रस्त्यावर उतरून आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांना आवश्यक साधने पुरेशा प्रमाणात असावीत, या हेतूने लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोमनाथ खामकर व गोरेवाडीचे राहुल घाडगे यांच्यावतीने मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील यांच्याकडे त्यांनी ते सुपुर्द केले.