घाणीचे साम्राज्य
सातारा : सातारा पालिकेकडून ‘कुंडीमुक्त’ सातारा ही संकल्पना राबविण्यात आली. या अंतर्गत शहरातील सर्व कचरा कुंड्या हटविण्यात आल्या आहेत. महात्मा फुले भाजी मंडई व मार्केट यार्ड परिसरातील कुंड्या हटविल्याने, हा परिसर घाणीच्या विळख्यातून मुक्त होईल, असे वाटत असतानाच, या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरल्याने विक्रेत्यांबरोबरच खरेदीसाठी येणाऱ्या अनेक ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांची परवड
सातारा : सातारा पालिकेच्या वतीने शहरात भुयारी गटार योजनेचे काम करण्यात आले. व्यंकटपुरा पेठ, मंगळवार पेठ, यादोगोपाळ पेठ या भागात या योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे, परंतु खोदकामानंतर रस्त्याचे डांबरीकरण न केल्याने, मंगळवार पेठेतील नागरिकांना या मार्गावरून ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. पालिकेकडून भुयारी गटारचे खड्डे खडी व मुरुम टाकून बुजविण्यात आले होते. मात्र, पावसामुळे खड्ड्यांची अवस्था जैसे थे झाली आहे.
प्लास्टीक पिशव्यांच्या वापरात पुन्हा वाढ
सातारा : प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर बंदी असूनही शहरात प्लास्टीक पिशव्यांचा खुलेआम वापर केला जात आहे. पालिकेच्या दंडात्मक कारवाईची फळविक्रेते व दुकानदारांची धास्ती घेतली होती. प्लास्टीकऐवजी कापडी पिशव्यांच्या वापरात वाढ झाली होती. मात्र, संचारबंदीत पालिकेची कारवाई थांबल्याने शहरातील बहुतांश व्यापारी, दुकानदार व फळविक्रेत्यांकडून प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. पालिकेने शहरात पुन्हा एकदा कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून केली जात आहे.
सदर बझार येथे आरोग्य तपासणी
सातारा : शहरातील सदर बझार परिसरात गेल्या काही दिवसांपासून साथरोगांचा फैलाव वाढू लागला आहे. अनेक नागरिक ताप, थंडी, अंगदुखी अशा आजाराने त्रस्त असून, नागरिक खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी या भागात डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हिवताप विभागाकडून या परिसरात सर्व्हे करून नागरिकांची आरोग्य तपासणीही केली जात आहे.