सातारा : ‘लेखक लिहितो ते सत्य असतेच असे नाही. तेव्हा वाचकांनी वाचनाचा चिकित्सकपणे अभ्यास करावा,’ असे मत कॉ. किरण माने यांनी व्यक्त केले.
येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयातर्फे दिवंगत श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) यांचे स्मृतिप्रीत्यर्थ विविध ग्रंथालय पुरस्कारांचे वितरण नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये कॉ. किरण माने यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा सभापती सौ. सीता हादगे, अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक डॉ. रवींद्र भारती- झुटिंग, अध्यक्ष शशिभूषण जाधव, कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
माने पुढे म्हणाले, ‘श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज यांनी त्याकाळी ग्रंथाचे अनुवाद करून घेतले. स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. शिक्षणाविषयी त्यांना आस्था होती. त्यांनी सातारा शहरात सुरू केलेले, विकसित केलेले ग्रंथालयीन कार्य अश्वमेध ग्रंथालय पुढे नेत आहे. या त्यांच्या कार्यातले सातत्य कौतुकास्पद आहे.’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. रवींद्र भारती म्हणाले, ‘अश्वमेध ग्रंथालय वाचन संस्कृती जोपासताना ग्रंथाला आणि ग्रंथालयांना विविध पुरस्कार देण्याचे काम करत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाचे माध्यमातून युवकांच्यात आणि समाजात प्रबोधन करणेचे काम करत आहे.’
पुरस्काराविषयी भूमिका मांडताना कार्याध्यक्ष साहित्यिक डॉ. राजेंद्र माने म्हणाले, ‘पुरस्कार ही ग्रंथ चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीवरची थाप आहे; पण हा थांबा नव्हे. या पुरस्कारापासून प्रेरणा घेऊन पुढे कार्यरत व्हायचे आहे. ग्रंथांनी माणूस समृद्ध आणि प्रगल्भ होत असतो. ग्रंथालये ग्रंथ वाचकांच्या हाती सोपवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. त्यांना गौरवण्याचे अश्वमेध ग्रंथालय काम करत आहे.’
शिवानी भारती- झुटिंग हिने कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले, तर शशीभूषण जाधव यांनी आभार व्यक्त केले. यावेळी अरुण माने, स्वाती राऊत, डी. टी. थोरात यांनी पुरस्काराला उत्तर म्हणून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रा. श्रीधर साळुंखे, नाना कदम, राजाराम राक्षे, प्रदीप कांबळे, केदार खैर, सादिक खान, मदन देशपांडे, संजय साबळे, गौरव इमडे, नीलेश पवार, गौतम भोसले, गोरखनाथ पाटील व ग्रंथप्रेमी उपस्थित होते.
फोटो ओळ : सातारा येथील अश्वमेध ग्रंथालयाच्या वतीने उत्कृष्ट ग्रंथालयांना पुरस्कार वितरित करण्यात आले.