पाटण : कोकणातील बदलत्या हवामानाचा धोका हापूस आंबा उत्पादनावर होतो. त्यामानाने घाटावरचा हापूस आंबा शेतीस हवामानाचा धोका जाणवत नाही. रत्नागिरी हापूस व घाटावरच्या हापूस आंब्यांची चव एकसारखी असून, कोकणातील हापूस आंब्याची गुणवत्ता घाटावरच्या आंब्यामध्ये आहे. मात्र, घाटावरच्या हापूस आंब्याचे बाजारपेठेत म्हणावे तितके बँ्रडिंग होत नसल्याची खंत दापोली कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. वैभव शिंदे यांनी व्यक्त केले.पाटण येथे आयोजित एकात्मिक फलोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत राज्य शासनाने आयोजित केलेल्या हापूस आंबा उत्पादक प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.डॉ. वैभव शिंदे म्हणाले, ‘पाटण तालुक्यात हापूस आंबा उत्पादनाला पोषक वातावरण आहे. कोकणातील आंबा उत्पादक आंबा विक्रीसाठी जसे एकत्र येतात, तसे घाटावरच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी हापूस आंब्याला चांगली बाजारपेठ मिळविण्यासाठी एकत्र आले पाहिजे. घाटमाथा परिसर व पाटण तालुक्यात आवळासारख्या औषधी वनस्पती भरपूर झाले आहेत. अशा वनस्पतींना जर चांगल्या दर्जाचे कलमे करून घेतली तर आवळ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळू शकेल. येत्या काही दिवसांत घाटमाथा व पाटण परिसरात पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस येणार आहेत. त्यादृष्टीने येथील स्थानिक भूमिपुत्रांनी मानसिक तयारी करून पर्यटन व्यवसायाचा लाभ घेतला पाहिजे.यावेळी प्रांतधिकारी जाधव, तहसीलदार रवींंद्र सबनीस तालुका कृषी अधिकारी आर. एस. मुल्ला, पंचायत समिती सदस्य नथुराम कुंभार तसेच कोकिसरे, मणदुरे, शिरळ व कोयना विभागतील हापूस आंबा उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)बाजारपेठेची गरजपाटण तालुक्यात हापूस आंब्यासाठी पोषक व जांबा खडक मिश्रित जमीन आहे. घाटमाथ्याचे संरक्षण लागलेल्या या परिसरात हापूस आंबा लागवड सुरक्षित राहते. फक्त येथील आंबा उत्पादनास बाजारपेठ मिळाली तर पाटणची ओळख हापूस आंब्यामुळे होईल.
रत्नागिरी इतकाच घाटावरचा हापूस चवदार
By admin | Updated: February 27, 2015 23:24 IST