सांगली : महिन्यापूर्वी साताऱ्यात झालेला सशस्त्र दरोडा व सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात सांगली पोलीस दलातील ‘बिल्लू’ या श्वानाने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. गुन्हे उघडकीस आणण्यात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘बिल्लू’ने सांगलीचा साताऱ्यात झेंडा फडकाविला. बिल्लूसह त्याच्यासोबत असलेल्या पथकाचा जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी मंगळवारी बक्षीस देऊन गौरव केला. गेल्या महिन्यात सातारा येथे सशस्त्र दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी एका झोपडीवरही दरोडा टाकला होता. या झोपडीतील दाम्पत्य बांधकामाच्या ठिकाणी रखवालदारीचे काम करीत होते. दरोडेखोरांनी त्यांना मारहाण केली होती. त्यानंतर महिलेवर तिच्या पतीसमोर सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेने पश्चिम महाराष्ट्र हादरून गेला होता. अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बनलेल्या दरोडा व सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्याचा छडा लावणे सातारा पोलिसांना आव्हान बनले होते. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी सांगली पोलीस दलातील ‘बिल्लू’ श्वानाची मदत घेण्यात आली होती. बिल्लूने घटनास्थळापासून ते महागाव (जि. सातारा) येथील हॉटेल ‘माऊली’पर्यंत माग काढला होता. तसेच दोन संशयित दरोडेखोर निष्पन्न करून दिले होते. (प्रतिनिधी) तपासाला दिशा केवळ ‘बिल्लू’ने तपासाची योग्य ‘दिशा’ दाखविल्यामुळे सातारा पोलिसांना या गुन्ह्याचा छडा लावता आला. त्यामुळे पोलीसप्रमुख फुलारी यांनी ‘बिल्लू’सह श्वानपथकातील हवालदार अनिल रजपूत, सुहास भोरे, संजय तुपे, सुशांत कांबळे, अभिजित फडतरे, राजेंद्र कुडलापगोल यांचा बक्षीस देऊन गौरव केला.
बलात्कार, दरोड्याचा ‘बिल्लू’कडून छडा
By admin | Updated: October 6, 2015 23:38 IST