खरंतर महेश जाधव यांना चित्रकलेची आवड. चित्रकलेतील शालेय स्तरावरील परीक्षाही ते उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल २५ वर्षांपूर्वी महेश जाधव असेच घरात वृत्तपत्र वाचत बसले होते. तेव्हा त्या वृत्तपत्रामध्ये त्यांना लक्ष्मीची पावले आलेली पाहायला मिळाली. ही पावले आपण रांगोळीतून साकारु शकतो का? प्रयत्न तरी करुन पाहुयात, असे म्हणत त्यांनी स्वत:हूनच या लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढली. त्यांना ती हुबेहूब जमली.
रांगोळी काढण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. साताऱ्यातील मोती चौकामध्ये नवरात्रोत्सवात मोठी दुर्गादेवीची मूर्ती बसवली जाते. तसेच याठिकाणी आरतीसाठी पहाटे व सायंकाळी भाविक मोठी गर्दी करतात. महेश जाधव यांनी देवीसमोर रांगोळी काढण्याचा प्रस्ताव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांपुढे मांडला. पदाधिकाऱ्यांनीही त्यांना दुजोरा देऊन प्रोत्साहन दिले. महेश यांनी २० फुटी रांगोळी काढण्याचा निश्चय केला. मोती चौक-राजवाडा-देवी चौक- मंगळवार तळे या संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूला त्यांनी रांगोळी काढली. रांगोळीमध्ये त्यांनी सेवाभावही जोपासला आहे. सज्जनगड, गोंदवले याठिकाणी होणाऱ्या उत्सवात ते सेवाभावी वृत्तीने रांगोळी काढायला जातात.
कमी रंगांमध्ये रांगोळी काढण्याची अनोखी कला त्यांच्याकडे आहे. रांगोळी काढण्याआधी ते रांगोळीचे रंग भरतात. त्यानंतर रांगोळी काढली जाते. त्यांच्या या अनोख्या कलेमुळे आता महिलाही त्यांच्याकडे रांगोळी शिकण्यासाठी येतात. दैवज्ञ मंगल कार्यालयामध्ये त्यांनी महिलांना प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून रांगोळी शिकवली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही शाळांमध्येदेखील ते मुलींना रांगोळी शिकवतात. रिमांड होम, मुलींचे होस्टेल याठिकाणीही ते रांगोळी शिकवतात. आता बारसे, डोहाळे, स्नेहसंमेलने, उद्घाटन कार्यक्रमांमध्ये त्यांना संधी मिळते. त्यामुळे त्यांच्या रांगोळी काढण्याच्या छंदाला व्यावसायिकतेची जोड मिळाली आहे. रांगोळीच्या व्यवसायात त्यांनी चांगलेच बस्तान बसवले आहे.
राज्यस्तरावर मिळाला गौरव..
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे राज्यस्तरीय कला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत रांगोळी गालिचा प्रकारात त्यांचा हातखंडा आहे. या स्पर्धेत महिलांचा सहभाग मोठा होता तरीदेखील महेश जाधव यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.
साहित्यिकांची पाठीवर थाप
कऱ्हाड येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. तेव्हा दत्त चौकामध्ये मोराचा लोगो असलेली भव्य आणि आकर्षक रांगोळी महेश जाधव यांनी काढली. मात्र, तिला दुसऱ्याचंच नाव लागल्यानं त्यांच्यावर थोडा अन्यायच झाला. मात्र, संमेलनाची ग्रंथदिंडी निघाली, तेव्हा दिग्गज साहित्यिक रांगोळीजवळ थांबले, त्यांनी या रांगोळीचे भरभरुन कौतुक केले तसेच महेश यांच्या पाठीवर कौतुकाची थापदेखील मारली.
- सागर गुजर
फोटो येणार आहे