सचिन जवळकोटे- सातारा ‘शिशे के घर में रहनेवाले कभी दुसरों के घर पे पत्थर नहीं फेका करते,’ हा डायलॉग राजकुमारच्या तोंडून ऐकताना लई भारी वाटायचा राऽऽव. पण हाच संवाद जेव्हा सातारच्या लाडक्या बाबाराजेंनी फेकला, तेव्हा अनेकांच्या हृदयातून म्हणे ‘खळऽऽ खट्याऽऽक’ आव्वाज आला. दगाबाजीचा फटका बसल्यानं संतप्त राजे हातात दगड घेऊन आक्रमक बनलेत अन् हे ‘शिशों के घर’वाले कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या पाठीमागं लपलेत, असंच काही-बाही चित्रविचित्र दृश्य आम्हा पामराच्या डोळ्यांसमोर तरळून गेलं.यंदा सातारा शहरात मतदानच कमी झालं. ‘आपल्या नेत्याला भरभरून मतं द्यावीत,’ अशी भावना खूप कमी ठिकाणी जाणवली. लोकांना बाहेर काढण्यात शहरातली टीमही कमी पडली. पालिकेच्या प्रत्येक कामात ‘टक्का’ शोधणाऱ्या काही ‘मेहरबान’ मंडळींना ‘नजराणा’ न मिळाल्यानं त्यांची गाडी घरासमोरच थांबली. नैवेद्य-प्रसाद मिळणार नाही म्हणून गाभाऱ्यातल्या पुजाऱ्यांनी देवाची पूजाच टाळली. म्हणूनच बघू या आता... बाबांच्या हातातली दगडं खरंच अंगावर पडतात की पुन्हा फुलं बनतात?सातारा-जावळीच्या विकासासाठी शिवेंद्रराजेंनी आजपर्यंत सातत्यानं वेगवेगळे प्रयोग केलेले. भरभरून कामही केलेलं. ‘मी नाही, माझं कामच बोलतं’ अशी मस्त टॅगलाईन घेऊन त्यांचा प्रचार रंगलेला. या वाक्याचे फ्लेक्स मिरवत गाड्याही फिरलेल्या. तरीही त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा निम्मं मताधिक्य यंदा मिळालं. याचा अर्थ, ‘त्यांचं काम कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत निम्मंच पोहोचविलं,’... असो. ज्या शाहूपुरीत त्यांनी आजपावेतो प्रचंड कामं केलेली, तिथलीही मतांची आकडेवारी अत्यंत धक्कादायक. कदाचित, ‘मोदी’ लाटेचाही मोठा प्रभाव असावा. मात्र, तरुण वर्गाला सोबत घेऊन जाण्यासाठी बाबाराजेंना यापुढं अधिक काम करावं लागणार. आजूबाजूची तीच ती जुनी धेंडं थोडीशी बाजूला सारून नव्या ताकदीची दमदार फळी बनवावी लागणार, तरच त्यांच्या हातातल्या दगडांनाही दोन वर्षांनंतरच्या पालिका निवडणुकीत ‘वजन’ प्राप्त होणार!उदयनराजे मनापासून सोबत; पण कार्यकर्ते...शिवेंद्रराजे तसे खूप शांत. संयमी. पण काल ते प्रथमच चिडले. ‘आजपर्यंत माझा हात दगडाखाली होता. आता मी मोकळा झालोय. माझ्याही हातात आता दगड आहे!’ असा सज्जड दम त्यांनी ‘खंजीर’वाल्यांना दिला. झालं. मीडियाला ‘ब्रेकिंग न्यूज’ मिळाली. मात्र, हे ‘खंजीर’वाले काही मीडियाला शेवटपर्यंत सापडलेच नाहीत. कारण, बाबाराजेंनी बोलताना स्पष्टपणे कुणाचंच नाव घेतलं नव्हतं. किती नगरसेविका प्रचारासाठी बाहेर पडल्या, असा सवालही त्यांनी केला नव्हता किंवा ‘सदर बझार’मध्ये ‘रात्रीचा दिवस’ करून ‘निशांत’नं भाजपचा कसा ‘दीपक’ उजळविला, हेही उलगडून सांगितलं नव्हतं. निकालानंतर रस्त्यांवर अभिनंदनाचा फ्लेक्स लावणाऱ्यांपैकी कितीजण मनापासून प्रचारात होते, हेही स्पष्ट होत नव्हतं. खरंतर, गांधी मैदानावरच्या सांगता सभेत उदयनराजेंनी ‘बाबाराजेंना प्रचंड मतांनी विजयी करा,’ असं मनापासून सांगितलं होतं; मात्र काही मेंबरनी म्हणे फक्त ‘विजयी करा,’ एवढाच मेसेज फिरविला. ‘प्रचंड’ शब्दच गायब केला!
राजे... तुमचं काम निम्मंच बोललं!
By admin | Updated: October 20, 2014 22:35 IST