सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, साताऱ्यातही जोरदार सरी पडत आहेत. सततच्या पावसामुळे प्रमुख धरणसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे, तर २४ तासांत कोयना धरणात दीड टीएमसीने वाढ झाली. त्यामुळे सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ५१.४९ टीएमसी साठा झाला होता. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस नवजाला ९८ मिलिमीटर झाला.
जिल्ह्यात तीन आठवड्यांच्या खंडानंतर मागील आठवड्यात पाऊस सुरू झाला आहे. सध्या हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस होत आहे. या पावसामुळे पश्चिमेकडे भात लावणीच्या कामाला वेग आला आहे. तसेच प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात नवजा येथे सर्वाधिक ९८ मिलिमीटर पाऊस झाला. जूनपासून आतापर्यंत तेथे १,८२४ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. कोयनेला ४९ व जून महिन्यापासून १,३१२ मिलिमीटर पाऊस झाला. महाबळेश्वरला सकाळपर्यंत ६७ आणि यावर्षी आतापर्यंत १,८३० मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. शनिवारच्या तुलनेत पश्चिम भागात पाऊस अधिक झाला.
रविवारी सकाळी कोयना धरणात ५०.०४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. सोमवारी ५१.४९ टीएमसी साठा होता. कोयना धरणात २४ तासांत जवळपास दीड टीएमसी पाणी वाढले. त्याचबरोबर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक चांगली आहे. सकाळच्या सुमारास १६,७०६ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरण परिसरातही पाऊस होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे. पूर्व दुष्काळी भागात कधीतरी पावसाची एखादी सर पडत आहे. अजूनही ओढ्यांना पाणी नाही. सातारा शहरात रविवारी रात्रीपासून चांगला पाऊस होत आहे. सोमवारी सकाळीही सरी पडल्या. यामुळे नागरिकांची तसेच विक्रेत्यांची धावपळ उडाली.
.........................................................