महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा हाहाकार सलग तीन दिवसापासून सुरू आहे. या काळात २० इंच पाऊस पडला. पावसाची संततधार कायम सुरूच महाबळेश्वर शहर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वेण्णालेकच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे.
महाबळेश्वरमध्ये गतवर्षीपेक्षा यावर्षी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. गुरुवार, दि. १७ पासून शनिवार, दि. १९ सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तीन दिवसात तब्बल ५०६.८९ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. शनिवारी साडेआठपर्यंत ९१९ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. गतवर्षी १९ जूनपर्यंत एकूण पाऊस ६८०.०५ मिलीमीटर पडला होता. शनिवारी सकाळी पावसाने काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारी एक वाजता पुन्हा पावसाचा वेग वाढला. पावसाची येणारी एक सर जवळपास दहा ते पंधरा मिनिटे होती. त्यामुळे बाजारपेठेमधील गटारे ओसंडून रस्त्यावर पाणी वाहत होते. पालिकेच्या गटारे स्वच्छ मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पावसाचा जोर जर असाच राहिला तर वेण्णा धरणाच्या सांडव्यावरून तीन दिवसात पाणी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.