फलटण : फलटण शहर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या टाकलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फलटण शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवार, दि. ३ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाचबत्ती चौक येथे रोडकडेला असलेल्या गाळ्यात अजय आनंद अहिवळे (वय २७, रा. मंगळवार पेठ, फलटण) हा बेकायदेशीरपणे मटका स्वीकारताना मिळून आला. तसेच त्याच्याकडील ६ हजार ७६५ रुपयांची रोख रक्कम, पंधरा हजार रुपयांचा मोबाईल, शंभर रुपयांचा कॅल्क्यूलेटर व मटक्याच्या पावत्यांच्या नोंदवह्या असा एकूण २१ हजार ८७० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक संदीप लोंढे यांनी दिली असून, अजय आनंद अहिवळे याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विक्रांत लावंड हे करीत आहेत. अन्य एका टाकलेल्या धाडीत याच दिवशी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जयभवानी कॉम्प्लेक्स येथील हॉटेल आसराशेजारी नीलेश राजेंद्र विटकर (रा. घडसोली मैदान, फलटण) हा कोणताही परवाना नसताना मटका घेताना मिळून आला. त्याच्याकडील ७२० रुपये, चार हजार रुपयांचा मोबाइल व पेन असा चार हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक महेश बोडरे यांनी दिली असून, नीलेश विटकर याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार फरांदे करीत आहेत.