लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पाटण तालुक्यातील दुटाळवाडी हद्दीत एका घराच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर उंब्रज पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिसांनी या कारवाईत ७६८० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दुटाळवाडी हद्दीत असणाऱ्या लहू शंकर चव्हाण यांच्या राहत्या घराच्या आडोशाला असलेल्या मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती उंब्रज पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. धनाजी संपत निकम (वय ३४), नितीन गणपत साळुंखे (वय ४०), लहू शंकर चव्हाण (वय ७२, सर्व रा. दुटाळवाडी, पो. नुने, ता. पाटण), हणमंत अण्णा ढाणे (वय ५३), सादिक इस्माईल मुलाणी (वय ३५, रा. तारळे, ता. पाटण), आनंदा जगन्नाथ सोनावले (वय ५६), राजेंद्र हणमंत सपकाळ (वय ३०), सचिन दादासोा कोंडावले (वय ३८), प्रवीण नामदेव पिंपळे (वय ३७), सुनील दादासोा कोंडावले (वय ३४, सर्व रा. नुने, ता. पाटण, जि. सातारा) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.