कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर पालिकेच्या सभागृहामध्ये नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष सुरेखा माने, मुख्याधिकारी संजीवनी दळवी उपस्थित होत्या.
जिल्ह्याप्रमाणे रहिमतपूर येथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रात येणारी कोविड लस अल्पप्रमाणात येत असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे लसीकरण झालेले नाही. कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी गर्दी करतात. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर पुरेशी लस उपलब्ध होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा अनेक नगरसेवकांनी व्यक्त केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्याचा होणारा परिणाम कमी करण्यासाठी ठोस पर्यायी व्यवस्था म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुनील माने यांनी १४ वित्तयोगाच्या पैशाच्या व्याजातून कोविड लसींची खरेदी करण्याचा विषय मांडला.
या विषयावर सविस्तर चर्चा केल्यानंतर सभागृहाने या ठरावाला एकमताने मंजुरी दिली. कोरोना लस खरेदी ही बाब रहिमतपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्याबाबत संबंधित विभागाची मंजुरी घेऊन लवकरात लवकर ही लस शहरातील सर्व नागरिकांना मोफत देण्यात येईल, असे नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी जाहीर केले.
या निर्णयाचे सर्व नगरसेवकांनी स्वागत केले. ब्रह्मपुरी येथे उभारलेल्या कोरोना सेंटरला मदत करणाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच विविध योजनांअंतर्गत प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यास मान्यता देण्यात आली. तसेच इतर सहा विषयांना मंजुरी देण्यात आली.