सातारा : जिल्हा रुग्णालयाच्या आवारात रस्त्याकडेला लावण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या व टपऱ्यांची रांग बुधवारी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हटविण्यात आली. प्राप्त तक्रारींची पालिकेने तातडीने दखल घेतल्याने रुग्णालय परिसराने मोकळा श्वास घेतला.
जिल्हा रुग्णालयात जिल्ह्याच्या कोनाकोपऱ्यातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. सध्या कोरोना चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे परिसरात शांतता टिकून राहणे गरजेचे आहे. परंतु वाढते अतिक्रमण, हातगाडीधारकांमध्ये होणारे वादावादीचे प्रकार, वाहतुकीची कोंडी अशा घटनांमुळे जिल्हा रुग्णालयाची शांतता सातत्याने भंग होत आहे.
रुग्णालयाच्या संरक्षक भिंती बाहेर खाद्यपदार्थ, फळ, नारळपाणी विक्रेत्यांनी आपले गाडे लावले आहेत. त्याच्या शेजारी चहा, वडापाव, भजी विक्रेत्यांनीही गर्दी केल्यामुळे येथील अतिक्रमणांचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता. दोनच दिवसांपूर्वी येथील दोन फळविक्रेत्यांमध्ये मोठी वादावादी झाली होती. या वादातून शांतता भंग करणारी व वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पालिकेने कारवाई करावी, अशा तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींनुसार बुधवारी दुपारी अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या पथकाने जिल्हा रुग्णालयाच्या संरक्षण भिंती बाहेरील सर्व हातगाड्या व टपऱ्या काढून टाकल्या. कारवाईच्या भीतीने काही जणांनी आपल्या गाड्या स्वत:हून हटविल्या. अनेक महिन्यानंतर जिल्हा रुग्णालयाचा परिसर मोकळा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
चौकट :
ठोस कारवाई हवी...
पालिकेच्या अतिक्रमण विभाग पथकाने यापूर्वी देखील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील सर्व हातगाड्या व टपऱ्या हटविल्या होत्या. मात्र, काही दिवसानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. एक-एक करत या परिसरात हातगाड्यांची रांगच लागली. त्यामुळे पालिकेने केवळ गाड्या न हटविता अतिक्रमण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, तरच हा परिसर कायमस्वरूपी मोकळा राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
फोटो मेल :
सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभाग पथकाने बुधवारी जिल्हा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीबाहेर लावण्यात आलेल्या हातगाड्या हटवून परिसर अतिक्रमणमुक्त केला.