सातारा : नातेवाइकांच्या घरासमोर दुचाकी लावून नळावर पाय धुण्यासाठी गेलेल्या महिलेची दुचाकीला अडकवलेली पर्स दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शाहूपुरी परिसरात घडली. यामध्ये बारा हजार रुपयांचा मोबाइल हॅण्डसेट आणि चार हजारांची रोकड होती.
या प्रकरणी धनश्री सुनील गाडेकर (वय ३०, रा. मंजूळा हौसिंग सोसायटी, दिव्यनगरी, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धनश्री गाडेकर यांनी १७ मे रोजी श्री राम कॉलनी येथे राहणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांच्या घरासमोर दुचाकी लावली होती. दुचाकी लावून त्या पाय धुण्यासाठी नळावर गेल्या. या वेळी त्यांनी पर्स दुचाकीलाच अडकवली होती. यामध्ये बारा हजार रुपयांचा मोबाइल आणि चार हजारांची रोकड असा १६ हजारांचा ऐवज होता. पाय धूत असतानाच दोन अज्ञातांनी दुचाकीला लावलेली पर्स लांबवली. या प्रकरणी त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण हे करत आहेत.