वडूज : निमसोड, ता. खटाव येथे श्री सिध्दनाथ यात्रेनिमित्त झालेल्या मैदानात पहिल्या दोन कुस्तीत महाराष्ट्रीय मल्लांनी बाजी मारली. त्यांनी पंजाबच्या मल्लांना चितपीट करीत बाजी मारली. या कुस्ती मैदानात पै. सनी ठाकूर (पंजाब) विरुध्द पै. विजय चौधरी (जळगाव) ही ३ लाख रुपयांची प्रथम क्रमांकाची कुस्ती झाली. एक मिनीटाची खडाखडी होण्याअगोदरच पै. चौधरीने पोकळ घिस्सा डावावर ठाकुरला आसमान दाखविले. द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी समाधान घोडके याने पंजाब केसरी जगरुप सिंगला मछली पठ्ठा डावावर चितपट केले. घोडकेला दोन लाखाचे इनाम मिळाले. तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत पै. मारुती जाधव (कोल्हापूर) याने अकलुजच्या पै. नितीन केचेवर मात केली. संग्राम पाटील विरुध्द बापू मंडले ही कुस्ती तसेच राजेंद्र सूळ व गोल्डनसिंग यांचीही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. जिल्हा परिषदचे माजी सदस्य जितेंद्र पवार, अप्पासाहेब शितोळे, अर्जून पाटील, सुभाष देशमुख, शिवाजी देशमुख, शिवाजी घाडगे आदींनी पंच म्हणून काम पाहिले. ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, महादेव मोरे, धैर्यशील देशमुख, रणजितसिंह देशमुख, विलासराव घाडगे, मधुकर घाडगे, आदींच्या हस्ते प्रमुख कुस्त्या लावण्यात आल्या. शंकर पुजारी कोथळीकर यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन केले. (प्रतिनिधी)
निमसोडच्या मैदानात पंजाबचे मल्ल चितपट
By admin | Updated: November 9, 2014 23:39 IST