लोकमत न्यूज नेटवर्क
पेट्री : शहराच्या पश्चिमेला कास मार्गावर सांबरवाडी फाटा येथे प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. मास्क न लावणारे तसेच मोटार वाहन कायदा कलमान्वये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर शनिवार, रविवार असे दोन दिवस दिवसभर तालुका पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. दोन दिवसात ४५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून दहा हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनी बहुसंख्य पर्यटक कास परिसराला भेट देतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यवतेश्वर परिसरात बॅरिकेट्स लावून पोलीस पथकाने वाहनांची कसून तपासणी केली. शनिवार, रविवार सलग सुट्टीमुळे बहुसंख्य पर्यटक सकाळपासून कासच्या दिशेने जाताना दिसत होते.
दरम्यान, शनिवारी व रविवारी तालुका पोलिसांनी सांबरवाडी फाटा येथे बॅरिकेट्स लावून नाकाबंदी करून मास्क न लावणारे, ट्रीपल सीट, विनापरवाना वाहने चालवणे, वाहनांची कागदपत्रं नसणे, मोटार वाहन कायदा कलमान्वये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंधरा वाहनचालकांवर शनिवारी दंडात्मक कारवाई करून तीन हजार रूपयांचा दंड वसूल केला. तर रविवारी तीस वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून सात हजार रूपयांचा दंड असा एकूण दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मास्क नसणाऱ्या आठजणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सुहास पवार, रमेश शिखरे यांच्याकडून करण्यात आली.
फोटो १६ कास
सातारा - कास मार्गावर शनिवारी, रविवारी पोलिसांनी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. (छाया : सागर चव्हाण )