रामापूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरून हे उघड झाले आहे. दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत करणाऱ्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार आणि संचालक श्रीनिवास यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी मराठा क्रांती चळवळ, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज पाटण तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मराठा समाजाच्या महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे उघड झाले आहे. वनविभागातील अधिकारी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार आणि संचालक श्रीनिवास या दोघांनी संगनमत करून दीपाली चव्हाण यांना त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत केले. स्वतः दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत तसे लिहिले आहे. अशा प्रवृत्ती व विकृती असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होऊन त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी.
या निवेदनाची प्रत पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात, पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांना देण्यात आली. या निवेदनावर मराठा समाजाचे समन्वयक पवन तिकुडवे, शंकर मोहिते, रणजित चव्हाण, अनिकेत देसाई, सुयेश चव्हाण, शंतनू पानस्कर यांच्या सह्या आहेत.