म्हसवड : ‘दहिवडी येथील कोरोना केअर सेंटरमधील बाधित रुग्णांची सुविधांअभावी हेळसांड होत आहे. याठिकाणी आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. रुग्णांना निकृष्ट जेवण दिले जात आहे. त्यामुळे सारखे फेसबुक लाईव्ह करून मोठी भाषणे करण्यापेक्षा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ग्राऊंड लेव्हलवर कोरोनाबाधितांना चांगले उपचार आणि सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत,’ अशी अपेक्षा आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली.
दहिवडी येथील कोरोना केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. आमदार गोरे म्हणाले, ‘माण तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दहिवडी येथील शासकीय कोरोना केअर सेंटरमध्ये सध्या ३८ रुग्ण आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसे वैद्यकीय कर्मचारी नाहीत. एक वैद्यकीय अधिकारी आणि दोन परिचारिका रात्रंदिवस काम करुन रुग्णांवर अपुऱ्या साधन सामग्रीने कसेबसे उपचार करत आहेत. बाधित रुग्णांना मिळणारे जेवणही अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. येथे मिळणारे जेवण हे जनावरेही खाणार नाहीत. बेड्सवर टाकायला साध्या बेडशिट्सही नाहीत. सर्वत्र अस्वच्छता आहे. योग्य सुविधा नसल्याने रुग्णांना येथे उपचाराचे तर सोडाच, थांबणेही मुश्कील झाले आहे.
दहिवडी सीसीसीमध्ये बाधित रुग्णांना सुविधा मिळत नसल्याबद्दल माहिती घेण्यासाठी माणच्या प्रांत आणि तहसीलदारांना फोन केला तर ते संपर्कहीन आहेत. जिल्ह्याचे अधिकारी सारखे फेसबुक लाईव्हद्वारे मोठी भाषणे झोडून जनतेवर निर्बंध लादत आहेत. ते गरजेचेही आहे, मात्र हे करताना त्यांनी बाधित रुग्णांवर योग्य उपचार आणि त्यांना योग्य सुविधा मिळतात की नाही, हे पाहणेही गरजेचे आहे. तालुका स्तरावरील अधिकारीही रोज बैठका घेऊन नक्की काय काम करतात, हे समजतच नाही. आवश्यक असणारा औषधसाठा आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करण्याला प्राधान्य देण्याऐवजी खालच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर रोब झाडायचे काम केले जात आहे. या बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयांवर अंमलबजावणी करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करण्याची गरज असताना, माण तालुक्यात मात्र अनागोंदी कारभार सुरू आहे. याठिकाणी रुग्णांची होणारी हेळसांड मी खपवून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत बाधितांचा जीव वाचला पाहिजे, त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत. त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना त्वरित केल्या नाहीत तर उद्रेक होईल, असा इशाराही आमदार गोरे यांनी दिला.
१९ म्हसवड
फोटो : दहिवडी येथील कोरोना केअर सेंटरला भेट देऊन वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून आमदार जयकुमार गोरे यांनी माहिती घेतली.