सातारा : केंद्र शासनाच्या एचयूआयडी (हॉल मार्किंग युनिक आयडी) कायद्याच्या विरोधात सोमवारी सातारा शहरासह जिल्ह्यातील सराफ संघटनांकडून बंद पाळण्यात आला. यावेळी एचयूआयडी कायद्याच्या जाचक अटी रद्द कराव्या, अशी मागणी सराफ संघटनेकडून करण्यात आली.
केंद्र् सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्कची (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) सक्ती केली आहे. त्यानुसार सोन्याची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील सराफ संघटनांनी हॉलमार्कच्या निर्णयाचे स्वागत केले आहे; परंतु एचयूआयडी कायदा व त्याच्या जाचक अटींना सराफ व्यावसायिकांचा तीव्र विरोध आहे. व्यावसायिकांकडून दागिन्यांचे अधिकृतरीत्या हॉलमार्किंग केले जाते. असे असताना हॉलमार्किंग युनिक आयडीची गरज नसताना अंमलबजावणी करायला लावणे हा व्यावसायिकांवर एकप्रकारे अन्याय असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
एचयूआडी ही घातक व किचकट प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळे दागिन्यांना सुरक्षा राहणार नाही. त्यामुळे शासनाने एचयूआयडी कायद्याच्या जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी सराफ संघटनेकडून करण्यात आली.
साताऱ्यात बंद आंदोलनामुळे सराफा पेढीत दिवसभर शुकशुकाट होता. या आंदोलनात सातारा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार बेनकर, उपाध्यक्ष शेखर घोडके, खजिनदार नितीन घोडके, सुरेश भोरा, किशोर घोडके, कुणाल घोडके, मामा नागोरी, मोती जैन, हरीष जैन, जितू राठोड, हिम्मत ओसवाल यांच्यासह व्यावसायिकांनी सहभाग घेतला.
फोटो : २३ जावेद ०१
सातारा शहरातील सराफ व्यावसायिकांनी सोमवारी एचयूआयडी कायद्यातील जाचक अटींच्या निषेधार्थ बंद आंदोलन केले. (छाया : जावेद खान)