वाई : ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या कर्तव्य बजावत असताना एका विक्रेत्याकडून त्यांच्यावर हल्ला झाला. यात त्यांची हाताची बोटे कापली गेली. तसेच डोक्यास मोठी जखम झाली आहे. या घटनेच्या विरोधात वाई नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून निषेध केला. तसेच तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात. तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नन्हे, तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी कामकाज बंद ठेवून निषेधार्थ घोषणा दिल्या. यावेळी कक्ष अधिकारी नारायण गोसावीसहित सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.