सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा गुरुवारी दुपारी चार वाजता थंडावणार आहेत. १९ जागांसाठी एकूण ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यासाठी आता शनिवारी (दि. ८ आॅगस्ट) मतदान होत आहे. यामध्ये एकूण ८ हजार २२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात कार्यक्षेत्र असणाऱ्या सांगली बाजार समितीची निवडणूक पाच गटांमध्ये होत आहे. त्यानुसार सहकारी संस्था मतदारसंघामध्ये २६६८, ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये २२८६ व हमाल, तोलाईदार मतदारसंघात १५८० मतदार आहेत. त्याचबरोबर व्यापारी मतदारसंघामध्ये १३०६ व प्रक्रिया किंवा खरेदी-विक्री संघातून ३७५ मतदार आहेत. बाजार समितीसाठी एकूण ८ हजार २२५ मतदार आहेत. बाजार समितीच्या १९ जागांसाठी ७० उमेदवार मैदानात असून, सोसायटी, व्यापारी, ग्रामपंचायत व हमाल तोलाईदार गटात सर्वाधिक उमेदवार आहेत. ग्रामपंचायतीच्या २ जागांसाठी- १० उमेदवार, सोसायटीच्या ७ जागांसाठी २१ उमेदवार, महिला २ जागांसाठी ४ उमेदवार, भटके विमुक्त १ जागेसाठी २ उमेदवार, ओबीसी एका जागेसाठी ५ उमेदवार, आर्थिक दुर्बल १ जागेसाठी ४ उमेदवार, अनुसूचित जाती-जमाती १ जागेसाठी ३ उमेदवार, व्यापाऱ्यांच्या २ जागांसाठी १३ उमेदवार, प्रक्रिया १ जागेसाठी ३ उमेदवार व हमाल-तोलाईदारांच्या १ जागेसाठी ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही निवडणूक राष्ट्रवादीप्रणित शेतकरी पॅनेल व काँग्रेसप्रणित वसंतदादा पॅनेलमध्ये होत आहे. (वार्ताहर) १९ केंद्रांवर मतदान सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एकूण १९ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व मिरजेचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली. यामध्ये सांगलीमध्ये पाच, मिरज तालुक्यामध्ये पाच, कवठेमहांकाळ तालुक्यात चार, तर जत तालुक्यामध्ये पाच अशी एकूण १९ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाचपर्यंत चालणार आहे.
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
By admin | Updated: August 6, 2015 00:47 IST