औंध : खटाव तालुक्यातील गोपूज येथील सोमनाथ सुदाम घार्गे हे भारतीय सैन्यदलात २४ वर्षे सेवा बजावून घरी आल्यावर त्यांचे आजी-माजी सैनिक संघटना व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली. सोमनाथ घार्गे हे १९९६ मध्ये अतिशय हलाखीच्या परिस्थितीशी झुंज देऊन सैन्यदलात भरती झाले. त्यांचे पहिले पोस्टिंग पंजाब येथे झाले. त्यानंतर श्रीनगर, कारगिल सिकंदराबाद, रांची, आसाम, गलेश्वर, कोलकाता, बंगाल या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. कारगिल युद्धात त्यांनी विशेष कामगिरी बजावली. एकूण त्यांनी २४ वर्षे पाच दिवस सेवा केली. हवालदार ते एसीपी नाईक सुभेदार असा त्यांचा प्रवास झाला. आपल्याच गावातील जवान इतकी वर्षे भारतमातेची सेवा करून सेवानिवृत्त होऊन घरी येतोय म्हटल्यावर ग्रामस्थांनी मोठ्या दिमाखात, पारंपरिक वाद्यवृंदात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले, तर ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
कोट...
‘मी देशाची सेवा करून आल्यानंतर आता मी माझ्या गावच्या युवा तरुणांना सैन्यभरती होण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. तसेच आमच्या आजी-माजी सैनिक संघटनेकडून जास्तीत-जास्त युवक भरती कशी होतील, यासाठी येथून पुढील काळात प्रयत्न करणार आहे.
-सोमनाथ घार्गे-माजी सैनिक
फोटो
०९औंध
फोटो : देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्यानंतर गोपूज ग्रामस्थांनी सोमनाथ घार्गे यांची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली.(छाया : रशिद शेख)