मायणी : येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे रुंदीकरण झाले; मात्र या राज्य मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या आजही कायम आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेमध्ये वाहन पार्किंग व्यवस्था होणे गरजेचे आहे, तसेच चांद नदीच्या काठावरून करण्यात आलेला बाह्यवळण मार्ग चांगल्या दर्जाचा होणे गरजेचे आहे.
जानेवारी २०२० मध्ये येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. दोन ते तीन महिन्यांमध्ये या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम पूर्ण करून देतो, असे आश्वासन संबंधित ठेकेदाराने अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिले होते. त्यामुळे मोठ्या उत्साहाने काही ग्रामस्थांनी वाहतुकीला अडथळा ठरत असलेले बांधकाम स्वखर्चाने काढून घेतले.
गतवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत लाॅकडाऊन जाहीर केले. त्यामुळे या राज्यमार्गाचे काम बंद पडले. त्यानंतर गेल्या वर्ष-दीड वर्षापासून विविध कारणांमुळे मुख्य बाजारपेठेतील सुमारे तेराशे मीटर राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम सतत थांबत होते. आज दीड वर्षानंतर हळूहळू पूर्णत्वाकडे गेले आहे. राज्यमार्गाचे रुंदीकरण झाल्यास या भागात नित्यनेमाची असलेली वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, अशी अशा या मुख्य बाजारपेठेत असलेल्या व्यापाऱ्यांना व स्थानिक रहिवाशांना होती.
रुंदीकरणानंतरही मुख्य बाजारपेठेतील व्यापारी व स्थानिक रहिवाशांच्या आशेवर पाणी पडताना दिसत आहे. राज्य मार्गाचे रुंदीकरण होऊ नये, या ठिकाणची पूर्वीची वाहतूक कोंडीची समस्या आजही कायम आहे. दिवसातून अनेकवेळा २० ते २५ मिनिटे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सतत वाहतूक कोंडी होत असल्याने मुख्य मार्गाकडेला असलेल्या व्यापाऱ्यांच्या व्यापारावरही परिणाम होत आहे.
(चौकट)
येथील चांद नदीच्या काठावरून लोकसहभागातून करण्यात आलेला बाह्यवळण रस्ता सतत विविध कारणांमुळे चर्चेचा विषय असतो. दगड-माती भरून कच्च्या स्वरूपात केलेला हा मार्ग उन्हाळ्यात वाहनांमुळे धुराचे लोट पसरत असल्याने स्थानिक रहिवासी यावरून वाहतूक करण्यास विरोध करतात, तर पावसाळ्यामध्ये चिखल-मातीचा रस्ता असल्याने वाहने रुतून बसतात. त्यामुळे वाहनचालक या भागातून वाहने घालण्यास टाळाटाळ करत असतात. त्यामुळे हा मार्ग चांगल्या दर्जाचा व लवकर होणे गरजेचे आहे.
३० मायणी वाहतूक कोंडी
मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर मायणी मुख्य बाजारपेठेत वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. (छाया : संदीप कुंभार)