सातारा : सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी सकाळी सोनगाव डेपोतून रस्त्यावर आलेला कचरा डेपोत टाकून रस्ता स्वच्छ केला. परंतु, विल्हेवाट लावण्याऐवजी डेपोच्या प्रवेशद्वाराजवळच कचऱ्याचे ढीग लावण्यात आल्याने सोनगावसह परिसरातील ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
सातारा शहरासह हद्दवाढीतील कचरा पालिकेकडून संकलित केला जातो. या कचऱ्याची सोनगाव डेपोतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात विल्हेवाट लावली जाते. हद्दवाढीमुळे डेपोत पडणाऱ्या कचऱ्यात वाढ झाली असून, हा कचरा आता संरक्षक भिंत ओलांडून रस्त्यावर येऊ लागला आहे. कचरा रस्त्यावर इतरत्र पसरत असल्याने सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे. तसेच सोनगावसह परिसरातील ग्रामस्थांना या मार्गावरून ये-जा करताना कचऱ्यातूूनच वाट काढावी लागत आहे.
या समस्येबाबत ‘लोकमत’मध्ये ‘सोनगाव डेपोतील कचरा थेट संरक्षक भिंतीच्या बाहेर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. याची दखल घेत सोमवारी सकाळी आरोग्य विभागाने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेतली. जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील सर्व कचरा पुन्हा डेपोत टाकून रस्ता चकाचक करण्यात आला. मात्र, डेपोच्या प्रवेशद्वाराजवळच कचऱ्याचे ढीग लावण्यात आले. प्रवेशद्वार उघडे असल्याने हा कचरा पुन्हा रस्त्यावर येऊन परिस्थिती जैसे थे होऊ शकते. त्यामुळे आरोग्य विभागाने या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
फोटो : १५ सोनगाव डेपो
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी सकाळी रस्त्यावर आलेला कचरा डेपोत टाकून रस्ता स्वच्छ केला. (छाया : सागर नावडकर)
लोगो : लोकमत फॉलोअप