इस्लामपूर : मागील संचालक मंडळाच्या काळात कृष्णा कारखान्याची विश्वासार्हता कमी झाली होती. पण डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाने कृष्णा कारखान्याची विश्वासार्हता पूर्वपदावर आणली आहे. त्यामुळे सभासद पुन्हा एकदा सहकार पॅनेलवरच आपला विश्वास दाखवतील, असे मत कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केले.
भवानीनगर (ता. वाळवा) येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सहकार पॅनेलचे उमेदवार जितेंद्र पाटील, संजय पाटील, जयवंत मोरे, अविनाश खरात, मनोज पाटील, डॉ. सुशील सावंत, रघुनाथराव मोहिते, बाबासो पाटील, बाळासाहेब पाटील, हरीभाऊ सावंत, शंकर मोहिते, अशोक मोहिते, प्रदीप गोडसे, युवराज गोडसे, सयाजी पाटील, विजय सावंत, अशोकराव गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, मागील संचालक मंडळाने काय केले हे सभासदांना माहिती आहे. निवडणूक म्हटले की टीकाटिप्पणी आली. पण विरोधकांनी त्यांच्या काळात काय चांगले केले हे त्यांना सांगता येत नाही. आम्ही मात्र या सहा वर्षांत काय केले व पुढे काय करणार, याचा लेखाजोखा सभासदांपुढे नेत आहोत. उच्चांकी दर, आधुनिकीकरण, गाळपक्षमता वाढ, सभासदांची विश्वासार्हता जपल्याने या वेळी सभासद पुन्हा सहकार पॅनेलकडेच सत्ता सोपवतील. सभासदांना योग्य न्याय देण्याची भूमिका सहकार पॅनेलने कायम ठेवली. राज्यात कृष्णा पहिल्या पाचमध्ये आहे. पुढील काळात तो एक नंबरला राहील, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
या वेळी डॉ. सुशील सावंत, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ सावंत, प्रदीप गोडसे यांची भाषणे झाली. आनंदराव भोसले यांनी आभार मानले.
फोटो ओळ :
भवानीनगर ता. वाळवा येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचार कार्यालय उद्घाटन व सभासद संपर्क दौऱ्याप्रसंगी बोलताना डॉ. अतुल भोसले.