खंडाळा : महामार्गावर खंबाटकी घाट व बोगदा परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातात आजपर्यंत अनेकांनी प्राण गमावले आहे. अपघातग्रस्त प्रवाशांना वेळीच मदत मिळावी, यासाठी खंडाळा पोलिसांनी स्वयंप्रेरणेने एक पाऊल टाकले आहे. प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी पोलीस व स्थानिक नागरिक यांनी मिळून खंडाळा रेस्क्यू टीमचे स्पेशल २१ जवानांचे पथक तयार केले आहे. त्यामुळे अपघातात अडकलेल्यांना तातडीने सहकार्य मिळणार आहे.पोलीस ‘रायजिंग डे’च्या औचित्य साधून खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन प्रांताधिकारी रवी खेबुडकर, गटविकास अधिकारी विलासराव साबळे, उपअभियंता के. पी. मिरजकर, खंडाळा सरपंच किरण खंडागळे, रेस्क्यू टीमचे अध्यक्ष अजित यादव, उपाध्यक्ष संतोष बावकर, कार्याध्यक्ष युवराज ढमाळ, भानुदास यादव यांच्यासह पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.खंडाळा रेस्क्सू टीमचे पोलीस कर्मचारी, प्रशिक्षित तरुण मुले, डॉक्टर, मॅकेनिक टेक्निशियन असे जवान समाविष्ट करण्यात आले आहेत. यासाठी लागणारे साहित्य पोलीस गाडीसह टीमच्या गाडीतही उपलब्ध असणार आहेत. ट्रेकिंगचे ट्रेनिंग घेणारे मुलेही यात काम करणार आहेत. अशी एकूण २१ जणांची स्पेशल टीम बनविली आहे.यावेळी बोलताना रवी खेबुडकर म्हणाले, ‘अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. या पथकातील सर्व सदस्यांना चांगले सहकार्य करू. खंबाटकी गटातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे टीम चांगले काम करेल. समाजासाठी हा वेगळा आदर्श आहे.’ (प्रतिनिधी)खंबाटकी घाटात होणाऱ्या अपघातातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांना वेळेत मदत मिळावी, यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला स्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला.-अशोक शेळके, पोलीस निरीक्षक
खंडाळ्यात ‘रेस्क्यू टीम’ तयार
By admin | Updated: January 7, 2015 23:52 IST