क-हाड शहरात घरगुती गणेश विसर्जनासाठी विविध ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची २२ जलकुंड उभारण्यात येणार असून गतवर्षाप्रमाणे यावर्षीही गणेशमूर्तींचे विसर्जन जलकुंडात करण्यात येणार आहे. यावर्षी जलकुंड वेगळ्या स्वरूपाची असणार आहेत. पालिकेच्यावतीने घरोघरी जाऊन गणेशमूर्तींचे संकलन करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, प्रीतीसंगमावर करण्यात येत असलेल्या विसर्जन तयारीची प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी पाहणी केली. गणेशोत्सव व त्यानुषंगाने करण्यात येणा-या उपाययोजना तसेच सूचना बैठकीत करण्यात आल्या आहेत. पालिकेचे वरिष्ठ मुकादम मारूती काटरे, मुकादम सुरेश शिंदे व आरोग्य विभागाचे कर्मचारी कृष्णा घाट, स्मृतिस्थळ परिसर, वाळवंटातील भागातील कचरा, झाडे-झुडपे काढून परिसराची स्वच्छता करीत आहेत. वाळवंटात पुरामुळे अनेक ठिकाणी वाळूचे ढीग साचल्याने त्या ठिकाणी सपाटीकरण करून विसर्जनासाठीची व्यवस्था करण्यात येत आहे. या ठिकाणी शहरातील संकलित गणेश मूर्तींचे विधिवत पूजा करून बोटीतून नदीपात्रात विसर्जन करण्यात येणार आहे. पालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी बोटी तसेच अन्य यंत्रसामग्रीसह प्रात्यक्षिकही केले आहे.
फोटो : १२केआरडी०२
कॅप्शन : क-हाडात प्रीतीसंगमावर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून गणेशमूर्ती विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात येत आहे.