भुर्इंज : रात्रगस्तीवर असताना भुर्इंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नारायण पवार यांना एक निरोप मिळाला. महामार्गावर पुलावरून एक दुचाकीस्वार तरुण दुचाकीवरून पडला असून, त्याला मदतीची गरज आहे. या एका निरोपावरून सुरू झालेला चित्तथरारक शोध सुमारे तीन तासांनी संपुष्टात येऊन त्या तरुणाचे प्राण वाचवण्यात यश आले. चपळाई, जागरुकता आणि शोधक नजर या बळावर बजावण्यात आलेल्या या कामगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की संतोषकुमार लक्ष्मण माने (वय ३५, रा. किरपे, ता. कऱ्हाड) हा युवक शुक्रवारी रात्री ९ वाजता पिंपरी-चिंचवड येथून कऱ्हाडकडे येण्यास निघाला. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास त्याची दुचाकी (एमएच ११ एएस ८२६६) महामार्गावरील पुलावरून कोसळली. या घटनेत जबर जखमी झालेल्या माने याला जागचे हलताही येत नव्हते. त्याने त्याही अवस्थेत आपल्या अपघाताची माहिती नातेवाइकांना कळवली. नातेवाइकांनी भुर्इंजचे सहायक पोलिस निरीक्षक नारायण पवार यांना संपर्क साधला. मात्र, त्यांना अपघाताचे नेमके ठिकाण सांगता येईना. सुरुवातीला अपघात शिरवळ परिसरात घडला असावा, असे वाटल्याने शिरवळ पोलिसांना कळवण्यात आले. नंतर पुन्हा फोन आला तेव्हा अपघात वेळे, सुरूर भागात झाला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पवार यांनी वेळे वसुरूर परिसरातील महामार्ग पिंजून काढला. मात्र, तरीही शोध लागत नव्हता. त्यामुळे पवार यांनी पुन्हा एकदा खंबाटकी बोगद्यापासून सारा महामार्ग धुंडाळायला सुरुवात केली.त्यांनी वेळे येथील पोलिस मित्र मिलिंद पवार आणि किरण पवार यांच्याशी संपर्क साधला. ते दोघेही आपल्या सहकाऱ्यांसह पोलिसांच्या मदतीला धावले. वेळे सुरूर परिसरात काहीच आढळून आले नाही. पवार यांनी आणखी पुढे शोध घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शोध घेत पुढे येत असताना पवार यांना भुर्इंज येथील देगाव रस्त्यानजीक असलेल्या पुलाखालून वाचवा वाचवा, असा आवाज आला. तब्बल चार तासांच्या या थरारक शोध मोहिमेनंतर जखमी अवस्थेत संतोषकुमार माने आढळून आला. (प्रतिनिधी)अखेर ‘हेल्मेट’च आले कामी...केवळ हेल्मेट असल्यामुळे माने बचावला होता. पवार यांनी नातेवाइकांना संतोषकुमार सापडल्याचे कळवले. नातेवाइकांनी संतोषकुमारला पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, त्याच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. भुर्इंज पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल माने कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक नारायण पवार, त्यांचे सहकारी व पोलिस मित्रांंनी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत हार न मानता राबवलेल्या या मोहिमेबद्दल परिसरात कौतुक होत आहे.
पोलिसांमुळे वाचले अपघातग्रस्त दुचाकीस्वाराचे प्राण
By admin | Updated: July 17, 2016 01:05 IST