सातारा : येथील मार्केट यार्ड परिसरात दारूची अनेक दुकाने आहेत. त्यामुळे मार्केट यार्ड परिसर म्हणजे तळीरामांचा अड्डाच बनू पाहत आहे. येथील रस्त्याच्या कडेलाच भर दिवसा तळीरामांनी ठिय्या मांडलेला असतो. त्यांना चकना पुरविण्यासाठी काही अल्पवयीन मुले-मुली या परिसरात चणे-फुटाणे विक्री करत आहे. मात्र, प्रशासनाचेही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे.सातारा शहरातील मार्केट यार्ड ते राधिका रोड सतत गजबजलेला असतो. या परिसरात अनेक रुग्णालये, बंगले, हॉटेल्स आहेत. त्यामुळे हा परिसर शांत असल्याचा समजला जात होता. परंतु, ही ओळख नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या रस्त्याला आता तळीरामांचा अड्डा म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे. येथे प्रतिष्ठित लोकांची वर्दळ असते. प्रतिष्ठित मंडळी व महिलांना या तळीरामांचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा भर दिवसाच रस्त्याच्या कडेला तळीरामांची पार्टी चाललेली असते. येथूनच पोलिसांच्या वाहनांची वर्दळ असते; पण त्यांच्याही निदर्शनास ही बाब येत नाही. त्यांच्या कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने त्यांना आता कसलीही भीती उरलेली नाही. दारूच्या दुकानासमोरच काही अल्पवयीन मुले-मुली चणे-फुटाण्याचे हातगाडे घेऊन विक्री करातात. या मुलांकडूनच अनेकदा मद्यपी मंडळी दारूचे ग्लास भरून घेत आहेत. याकडे पोलिसांनी लक्ष घालून कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)तळीरामांचा फळविक्रेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. आमचा फळविक्रीचा व्यवसायही यामुळे अडचणीत येत आहे. - महादेव बिराजदार, फळविक्रेतास्थानिक नागरिकांना या परिसरातून ये-जा करताना तळीरामांचा त्रास सहन करावा लागत आहे. महिला आणि युवतींमध्ये त्यांच्याविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे.- अंकुश वाडकर, नागरिक
मार्केट यार्ड बनलाय तळीरामांचा अड्डा!
By admin | Updated: June 9, 2015 00:11 IST