सातारा : विजेचे बिल थकल्याने साताऱ्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा वीजपुरवठा शुक्रवारी सकाळच्या सुमारास महावितरण कंपनीने तोडला. यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालतील कामकाज काहीवेळ विस्कळीत झाले. पण, पर्यायी व्यवस्था केल्यानंतर काम सुरू झाले. दरम्यान, बिल न भरल्याने रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरू करण्यात आला नव्हता.
महावितरण कंपनीची कृषी,औद्योगिक तसेच घरगुती ग्राहकांची थकबाकी कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. यामुळे महावितरणच्या वतीने थकीत बिलाची वसुली मोहीम सुरू आहे. यासाठी अनेक महिन्यांपासून थकित बिल असणाऱ्या ग्राहकांची वीज तोडण्यात येत आहे. त्यातच मार्च महिन्याची अखेर जवळ आल्याने महावितरण कंपनीने वसुलीचा तगादा लावला आहे. यातूनच साताऱ्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा वीजपुरवठा तोडण्यात आला.
याबाबत महावितरण कंपनीकडून देण्यात आलेली माहिती अशी की, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे वीजबिलाची रक्कम ८६ हजार रुपये आहे. यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी जाऊन वीजबिल भरण्यास सांगितले होते. तसेच याबाबत नोटीस दिली होती. तरीही थकीत बिल भरले नाही. त्यामुळे शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा वीजपुरवठा तोडण्यात आला. सायंकाळपर्यंत बिल भरले नव्हते. त्यामुळे वीजपुरवठा जोडण्यात आला नव्हता.
दरम्यान, वीजपुरवठा तोडण्यात आल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजात विस्कळीतपणा आला. काम थांबले होते. जनरेटर सुरू केल्यानंतर कामकाज सुरू झाले.
फोटो ओळ :
सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा वीजपुरवठा तोडण्यात आल्यानंतर काही काळ कामकाज विस्कळीत झाले होते.