आॅनलाईन लोकमतढेबेवाडी (जि. सातारा), दि. १८ : पाटण तालुक्यातील मालदन-मान्याचीवाडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या हा रस्ता खड्ड्यांचे आगार बनल्याने दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत वारंवार मागणी करून सुध्दा जिल्हा परिषद बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.मान्याचीवाडी, सुतारवाडी या दोन ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र असलेल्या आणि सुमारे पाच हजारावर लोकसंख्या असलेल्या या दोन गावातील जनतेचा मालदन-मान्याचीवाडी हा दळणवळणाचा मुख्य रस्ता आहे. खड्डेयुक्त रस्त्यामुळे विद्यार्थी तसेच वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ता ठिकठिकाणी खचला असून काही ठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहे. परिणामी वाहनधारकही या रस्त्याला वाहन नेण्यास टाळाटाळ करीत आहेत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वृद्ध व्यक्ती तसेच रुग्णांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करुन सुद्धा या रस्त्याची दुरूस्ती केली जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या या विभागात पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यावरील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून रस्त्याची किमान डागडूजी करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
खड्डे इन... रस्ता आऊट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 13:46 IST