ब्रिटिशांनी १५० वर्षे भारतावर राज्य केले. इंग्रजांची अन्यायी राजवट उलथवून टाकण्यासाठी त्याकाळच्या भारतीय पुढाऱ्यांनी जीवाचे रान केले. पंडित नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांच्या स्वप्नातील भारताचे स्वप्न आता आकाराला आलेय. प्राचार्य पुरुषोत्तम शेठ स्वातंत्र्यदिनादिवशीची आठवण सांगताना म्हणाले, ‘मी तेव्हा सहावीत शिकत होतो. आम्ही शाळेमध्ये स्वच्छ गणवेश घालून गेलो होतो. स्वातंत्र्य मिळाल्याने सर्वच नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अत्यंत उत्साहाने आणि हर्षोल्हास करत लोक घराबाहेर पडत होते. पहिला स्वातंत्र्य दिनच तो... माझ्या अलिबाग तालुक्यातील मूळगावी रायगाव गोरीगाव येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या घराबाहेर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जिथे विजेेची सोय नव्हती, तिथे पणत्या लावण्यात आल्या हाेत्या. राष्ट्रसेवा दलाच्यावतीने प्रचंड मोठी मशाल मिरवणूक काढली होती. तालुक्याच्या अलिबाग या गावी गावातून बैलगाड्या निघाल्या होत्या. या बैलगाड्यांमध्ये बसून लोक स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्यासाठी गेले होते.’
स्वातंत्र्याची फळे आपण आज चाखत आहोत. मागे वळून पाहिलं तर बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण आदींचे मोठे योगदान पुढे येते. शैक्षणिक संस्थांना त्यांनी मोफत जमिनी मिळवून दिल्या म्हणून आज सर्वसामान्यांची मुले पदव्या घेऊन कुटुंबाला स्थिरता मिळवून देत आहेत. तेव्हाचे राजकारणी अत्यंत निस्पृह होते. ए. आर. अंतुले, मनोहर जोशी या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात तांत्रिक शिक्षणाची कवाडे खुली केल्यानेच तंत्रकुशल पिढी निर्माण झाली. स्वातंत्र्यामुळेच देशात १ हजारांच्यावर धरणे बांधली गेली. १९४८मध्ये भारत स्वतंत्र होता तरीदेखील लोक बैलगाड्या घेऊन पाणी आणायला जात होते. आता ग्रामीण पाणी पुरवठा योजनेमुळे घरासमोर नळ जोडले गेले आहेत. स्वातंत्र्यामुळे सुख मिळाले. मात्र, स्वैराचारही वाढीला लागला. स्वातंत्र्यानं आपल्याला बरंच काही दिलंय. प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्याबद्दल कृतज्ञता असणं गरजेचं आहे.
आपण आता स्वतंत्र झालो तोडफोड बंद...
१९४२मध्ये भारत छोडो आंदोलन पुकारण्यात आले होते. स्वातंत्र्याची प्रेरणा इतकी टोकाला पोहोचली होती की, ब्रिटिशांना सळो की पळो करुन सोडण्याचे काम सुरु होते. सरकारी कार्यालयांची तोडफोड केली जात होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी सरकारी कचेऱ्यांबाबत लोकांमध्ये द्वेष होता. त्यामुळे आता देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, कुणीही कार्यालयांची तोडफोड करायची नाही, ही कार्यालये आता स्वतंत्र भारताच्या पर्यायाने भारतीयांच्या मालकीची असल्याचे तेव्हाच्या पुढाऱ्यांना जनतेला सांगावे लागले होते.
- सागर गुजर
photo : १४independent