लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : फलटण नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचना करण्याचे आदेश निघाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. परंपरेप्रमाणे दोन्ही नाईक निंबाळकर घराण्यातच पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय सत्ता संघर्ष पाहायला मिळणार आहे.
विधानपरिषद सभापती विरुद्ध खासदार असे लढतीचे स्वरूप असणार आहे.
फलटण नगर परिषदेवर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे १९९१ सालापासून पूर्णपणे वर्चस्व आहे. मागील पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीने लढविली गेली होती. अत्यंत अटीतटीच्या लढतीत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखली असली तरी विरोधकांच्याही जागा वाढल्या गेल्या होत्या. प्रभाग रचनेप्रमाणे मागील निवडणूक झाली होती, यामध्ये १२ प्रभागातून २५ जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ आणि राष्ट्रीय काँग्रेसचे ९ नगरसेवक निवडून आले होते. महिला ओबीसी आरक्षण असलेल्या नगराध्यक्षा थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीताताई नेवसे यांनी बाजी मारत नगराध्यक्षपद मिळविले होते. महिलांच्या अनेक समस्या त्या मार्गी लावतील, असे वाटत असताना त्यांचे पंख छाटण्याचे प्रकार सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच सुरू झाले.
अनेकवेळा कुरघोडी होऊ लागल्याने त्या नगरपालिकेत फारशा फिरकल्याच नाहीत. सत्ताधारी आणि विरोधकामधील विकासकामामधील संघर्ष अनेकवेळा उफाळून आला. एकमेकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्नही झाले. विरोधकांनी त्यांच्या भूमिकेप्रमाणे विरोध करण्याचे काम केले.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये १६ नगरसेवक निवडून आले होते. विरोधकांना ते पुरून उरतील, असे वाटत होते; मात्र त्यांच्यातील आपापसातील मतभेद अनेक वेळा उफाळून आले. एकमेकांवर कुरघोडी करण्यातच अनेक नगरसेवकांची पाच वर्षे गेली.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून यापूर्वी त्यांचे विरोधक असलेले अनुप शहा यांना संधी दिली; मात्र त्यांच्याशी जुळवून घेण्यात सत्ताधारी गटाला अपयश आल्याने अनुप शहा यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधातच बंडखोरी करीत विरोधकांशी हातमिळवणी केली. यामुळे विरोधकांची धार कमी करण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देऊन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना बाजूला ठेवत, नगरपालिकेची सर्व सूत्रे गुंजवटे यांच्या हाती दिली. गुंजवटे यांनी यापूर्वी ३० वर्षे नगरसेवक म्हणून काम केले होते आणि त्यांना नगरपालिका कामकाजाचा चांगला अनुभव असल्याने त्यांना मिळालेली जबाबदारी म्हणून चांगले काम करून दाखवण्याची सुवर्णसंधी होती; मात्र त्यांनी सर्व सूत्रे हाती येताच नगरपालिका अधिकारी, कर्मचारी व सत्ताधारी गटातील नगरसेवकांवर आपला रुबाब दाखविण्याचे काम सुरू केल्याने त्यांच्या विरोधात सध्या सत्ताधारी गटातच प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तसेच महिला नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांना डावलून स्वीकृत नगरसेवकाच्या हाती सर्व सूत्रे दिल्याने नागरिकांमधूनही चांगल्या चर्चा नाहीत.
नगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधी राष्ट्रीय काँग्रेसने ९ जागा जिंकल्याने त्यांना चांगली छाप पाडण्याची संधी होती, त्यातच विरोधी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून खासदारकी मिळवल्याने विरोधकांना चांगली धार आली होती; मात्र विरोधकांना खासदारांच्या ताकदीचा नीट उपयोग करता आला नाही, त्यांच्यात पण काहीवेळा मतभेद दिसून आले. विरोधक आक्रमक असले तरी आक्रमकतेमध्ये सातत्याचा अभाव आहे. सत्ताधारी गटात पांडुरंग गुंजवटे यांच्या कामकाजाविषयी असलेल्या नाराजीचा फायदा आणि हाच प्रचाराचा मुद्दा विरोधकांना होण्याची शक्यता असल्याने विरोधक शांतपणे सत्ताधारी गटातील हालचाली पाहत आहेत. आगामी निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर हे मोठ्या प्रमाणात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता दिसत आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही नगरपालिका निवडणुकीत लक्ष घातले असून अनेक निकृष्ट कामाबद्दल त्यांनी पण जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या फंडातून शहरात अनेक हायमॅक्स दिवे बसविले आहेत.
जोड आहे...