प्रमोद सुकरे - कऱ्हाड गेले महिनाभर कऱ्हाड तालुक्यात डॉ. सुरेश भोसले व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या मनोमिलनाची चर्चा आहे. रविवारी डॉ. अतुल भोसले व अॅड. उदय पाटील यांची एक खासगी बैठक झाली. खोडशीत दूध संघावर दादांनी बाबांना कोयनेचे पेढे भरवले. त्यामुळे आनंदित झालेल्या बाबांच्या कार्यकर्त्यांनी जणू ‘जयवंत शुगर’ची साखरच वाटायला सुरुवात केलीय. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात नवीन समीकरणांचा ‘उदय’ होणार, हे आता नक्की झालंय! खरंतर कृष्णाकाठच्या ‘भाऊ-आप्पा’ या दोन बंधूंत संघर्षाची ठिणगी पडल्यापासून उंडाळकरांनी नेहमीच भोसलेंची पाठराखण केली आहे. त्या बदल्यात भोसलेंनी वेळोवेळी उंडाळकरांना दक्षिणचा गड कायम ठेवायला हातभार लावला आहे. म्हणजे ‘कृष्णे’त भोसले अन् विधानसभेत उंडाळकर असा अलिखित करारच कित्येकवर्षे सुरू होता.पण भासेलेंच्या कुटुंबातही डॉ. अतुल भोसलेंच्या रूपाने युवा नेतृत्व उभारी घेऊ लागलंय. कृष्णाकाठी रमणाऱ्या भोसलेंना मग विधानसभा खुणावू लागली. दरम्यान, आठ वर्षांपूर्वी भाऊ-आप्पांच्या वारसदारांचं मनोमिलन झालं. त्यामुळे ‘मुंबई अब दूर नहीं’ अशी भावना भोसलेंमध्ये निर्माण झाली. तालुक्याच्या राजकारणात उंडाळकरांच्या विरोधात एक महाआघाडी आकाराला आली. बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी सत्तांतर घडवले. पण विधानसभा निवडणूक येताच महाआघाडीत बिघाडी झाली. डॉ. अतुल भोसलेंच्या हातावर राष्ट्रवादीने उत्तरेतील घड्याळ बांधले आणि उंडाळकर भोसले यांच्यातील कऱ्हाड दक्षिणचा सामना पाच वर्षे पुढे ढकलला गेला, एवढेच!काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उंडाळकर अन् भोसले कऱ्हाड दक्षिणेतून आमनेसामने आलेच. पण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या तिरंगी लढतीत बाजी मारली. तेव्हापासून तालुक्याच्या राजकारणात स्थित्यंतरे घडू लागली. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, याचे प्रत्यंतर कऱ्हाड तालुक्यातील लोकांना येऊ लागले. कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत उंडाळकरांची मदत घेणार असल्याचे संकेत दीड महिन्यापूर्वीच डॉ. सुरेश भोसलेंनी दिले, तर गेल्या आठवड्यात जनतेच्या हितासाठी उंडाळकर भोसले गट एकत्र आल्याचे डॉ. अतुल भोसलेंनी एका कार्यक्रमात सांगून टाकले. मात्र विलासराव पाटील- उंडाळकर किंवा उदय पाटील यांनी याबाबत कुठलेही जाहीर वक्तव्य न केल्याने उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. रविवारी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या आवारातून निघालेल्या डॉ. अतुल भोसलेंची गाडी थेट खोडशीजवळ असणाऱ्या कोयना दूध संघाच्या आवारात पोहोचली. तेथे अॅड. उदय पाटील यांच्याशी सुमारे तासभर त्यांची चर्चा झाली. शेवटी दादांनी बाबांना कोयनेचे पेढे भरवले. मायेची शाल अन् फुलांचा गुच्छही दिला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्यात मनोमिलन झाले यावर शिक्कामोर्तब करायला आता हरकत नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. म्हणे यापूर्वीही झाल्यात बैठका अतुल भोसले व उदय पाटील यांच्यात झालेली ही बैठक समोर आली असली तरी यापूर्वी डॉ. सुरेश भोसले व विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यात सातारा येथे बैठक झाल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडीत पैलवान आनंदराव मोहिते, अॅड. अशोक मोहिते, महेश जाधव आदींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे समजते.
‘कृष्णा-कोयने’चा राजकीय प्रीतिसंगम
By admin | Updated: April 20, 2015 00:03 IST