सातारा : येथील वाढे फाट्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर शनिवारी सायंकाळी छापा टाकून पोलिसांनी पाच ते सहा जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये काही राजकीय नेते आणि पदाधिकारी असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, वाढे फाटा जवळील एका हॉटेलमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तेथे अचानक छापा टाकला. यानंतर पोलिसांनी तेथे जुगार खेळणाऱ्या पाच ते सहा जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या जवळील रोकड व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. सर्व जुगाऱ्यांना सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यामध्ये काही राजकीय नेते आणि पदाधिकारी असल्यामुळे पोलिसांनी त्यांची नावे अद्याप सांगितली नाहीत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.