स्वप्नील शिंदे ।सातारा : मारामारी, चोरीचे गुन्हे दाखल असल्याने न्यायालयात ‘बंटी-बबली’ हजर झाले. न्यायालयातून पुढची तारीख घेऊन हे दाम्पत्य घरी निघाले. मात्र, वाटेत त्यांना पुन्हा चोरी करण्याचा मोह आवरता आला नाही. या मोहापायीच त्यांना गजाआड व्हावे लागले. या बंटी-बबलीचे कारनामे ऐकून पोलीसही अवाक झाले.
मुंबई पोलीस दलामध्ये काम करणारे प्रवीण डफळ हे पत्नीसोबत गावी काळोशी, ता. सातारा येथे सातारा-मेढा एसटी बसस्थानकात बसमध्ये जात होते. पत्नी निकिता बसमध्ये जात असताना त्यांच्यामागे असलेल्या एका महिलेने धक्का देऊन पर्समध्ये हात घातला. पर्समधून ५०० रुपयांची नोट बाहेर काढली. तेवढ्यात डफळ यांनी त्या महिलेला रंगेहाथ पकडून सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
बंटी-बबली म्हणजेच रोशनी काळे व तिचा पती मोठ्या काळे हे सराईत गुन्हेगार असून, ते गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना गंडा घालण्याचे काम करतात. गर्दीच्या ठिकाणी बंटी-बबली जोडीने काखेत लहान मुलाला घेऊन धक्काबुक्की करत हात साफ करत असतात.
चोरी केल्यानंतर लगेच परिसरात असलेल्या रिक्षा पकडून चोरीच्या ठिकाणापासून दूर अंतरावर जात असतात. त्यानंतर चोरी केलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावली जात होती. अशाप्रकारे दररोज एक मोहरा पकडायचा आणि दिवस काढायचा, हा या बंटी-बबलीचा नित्यनियमच होता. सातारा शहर तसेच जिल्ह्यातील अनेक गर्दीच्या ठिकाणी लोकांचे खिसे व पर्स चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.चोरी पकडल्यानंतर अनेक शक्कलचोरी करत असताना एखाद्याने त्यांना अडवले किंवा पकडले. बबली गर्दीत लोकांसमोर स्वत: कपडे काढण्याचे किंवा स्वत:चे लहान बाळ आपटण्याची धमकी देत असते. तर बंटीला लोकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली की त्या लहान मुलाला चिमटा काढून रडण्यास प्रवृत्त करत असतात.सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दुसरी चोरी उघडसातारा मध्यवर्ती एसटी बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे काही महिन्यांपूर्वी बसवण्यात आले. त्यामुळे बसस्थानक पोलीस चौकीतील हवालदार दत्ता पवार, अरुण दगडे, प्रवीण पवार व केतन शिंदे यांनी मागील महिन्यात एका तरुणीला चोरी करताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर बुधवारी बंटी-बबलीला पकडण्यात यश आले.