कऱ्हाड : जिल्ह्याचे वेध लागलेले कऱ्हाड शहर सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून शेती, उद्योग, शिक्षण, बँकींग यासह प्रत्येक क्षेत्र विकसीत झाल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच याठिकाणी अनेक प्रशासकिय कार्यालयांची उभारणी झाली आहे. त्यामुळे जनतेला सर्व सोयी-सुविधा शहरातच मिळत आहेत. इतर क्षेत्रांबरोबरच कऱ्हाड सध्या पर्यटनाच्यादृष्टीनेही नावारूपास येत आहे. याठिकाणी असलेली प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना खुणावत आहेत. कऱ्हाडचा विस्तार आणी विकास झपाट्याने होत आहे. शहराबरोबरच नजीकच्या उपनगरांचाही सध्या लुक बदलल्याचे दिसुन येते. मलकापूरसारख्या उपनगरात चोवीस तास पाण्यासह इतर नावाजलेल्या योजना यशस्वीपणे राबविण्यात आल्या आहेत. तसेच विद्यानगरमध्ये अनेक महाविद्यालयांतून विविध क्षेत्रांचे शिक्षण दिले जात आहे. सैदापूरलाही सध्या चोवीस तास पाणी योजना राबविण्यात येत आहे. ओगलेवाडीमध्ये रेल्वे स्टेशन असल्यामुळे दळणवळण व व्यापाराच्यादृष्टीने हे उपनगर महत्वपुर्ण ठरत आहे. कऱ्हाडबरोबरच नजीकच्या मलकापूर, आगाशिवनगर, कोयना वसाहत, वारूंजी, विमानतळ, विजयनगर, सैदापूर, विद्यानगर, गजानन हौसींग सोसायटी, ओगलेवाडी, पार्ले, बनवडी, करवडी या उपनगरांतील लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. ज्यापटीत लोकसंख्या वाढताना दिसते त्याचपटीत येथे अनेक सोयी-सुविधा निर्माण होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यापारी आणि शैक्षणिक केंद्र असणाऱ्या कऱ्हाड शहरास हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरा लाभली आहे. शहरात विविध कालखंडात बांधण्यात आलेल्या वास्तू शहराच्या वैभवशाली इतिहासाचीच साक्ष देतात. अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे यापैकी बहुतेक वास्तू आजही बऱ्यापैकी सुस्थितीत असल्याचे दिसून येते. परीसरात ऐतिहासीक वास्तूंबरोबरच अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक या स्थळांना भेटी देतात. पर्यटनाच्या निमित्ताने येथे आलेल्या पर्यटकांना कऱ्हाडचा वाढता आवाका लक्षात येत आहे. शहरात यशवंतराव चव्हाण समाधी, प्रीतीसंगम बाग, नकट्या रावळ्याची विहीर, मनोरे आदी प्रेक्षणीय स्थळे आहेत. कऱ्हाडनजीकच सदाशिवगड, वसंतगड, गोलघुमट, वावरथड्याची विहीर आदी ठिकाणांना दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देत आहेत. तसेच आगाशिवनगर हे नजीकचे सर्वात महत्वाचे पर्यटनस्थळ आहे.
पर्यटन विकास कऱ्हाडसाठी ‘प्लस पॉइंट’
By admin | Updated: June 25, 2014 00:30 IST