लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर षड्यंत्र रचून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे खोटे गुन्हे रचणाऱ्यांच्या गेल्या महिनाभरातील वर्तणुकीची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच संबंधितांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे समर्थकांकडून करण्यात आली आहे. समर्थकांनी गुरुवारी भिलार दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘संबंधित गुन्हा दि. १८ मार्च रोजी घडला तर गुन्हा नोंद दि. २३ मार्चला झाला. हा गुन्हा नोंद करण्यासाठी राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी संबंधितांवर आपल्या पदाचा गैरवापर करून गुन्हा दाखल करण्यासाठी प्रचंड दबाव टाकल्याची निश्चित व ठोस माहिती प्राप्त झाली आहे. त्याप्रमाणे पुरावेही आहेत. त्यातच रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ‘आजपर्यंत दोन कामाला लावले आहेत, दोन अजून बाकी आहेत,’ अशी टिप्पणी केल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, सातारा जिल्ह्याची शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणारी आहे. विधान परिषदेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीच चिथावणीखोर वक्तव्य करून शांतता, सुव्यवस्था धोक्यात आणत असेल तर अशा व्यक्तीला अशा पदावर बसण्याचा कायद्याने कोणताही हक्क नाही. अशा व्यक्तीच्या वक्तव्याची पोलिस प्रशासनाने माहिती घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचा गुन्हा तातडीने दाखल करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित वक्तव्याची राज्य शासनाने दखल घेऊन अशा बेजबाबदार व्यक्तीस त्या पदावरून तातडीने निलंबित करावे. रामराजे यांच्या उद्गारानुसार दोनपैकी एक व्यक्ती म्हणजे उदयनराजे भोसले आणि दुसरी व्यक्ती आमदार जयकुमार गोरे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांत समाजसेवा करणाऱ्या सर्वच लोकप्रतिनिधींमध्ये निश्चित स्वरुपात भीती निर्माण झाली आहे. असे वक्तव्य करून रामराजे यांनी लोकशाहीला काळिमाही फासण्याचे काम केले आहे. षड्यंत्र रचून त्याद्वारे एखाद्याचे राजकीय खच्चीकरण करणे यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. राज्याच्या विधिमंडळातील अति उच्चपदस्थ व्यक्ती हा प्रकार करीत असेल तर त्यांनी त्या पदावर राहण्याचा नैतिक हक्क गमावला आहे. मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन वाचून त्याबाबत पोलिसांना तशा सूचना करण्यात येतील, असे स्पष्ट केले. माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सुनील काटकर, अॅड. दत्ता बनकर, विकास शिंदे, पंकज पिसाळ, सुभाष शेडगे, संग्राम बर्गे यांची यावेळी उपस्थिती होती. ११९९ मध्येही खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप१९९९ मध्ये उदयनराजे भोसले यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे कारस्थान अभयसिंहराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रचले होते. त्यावेळी सुमारे २२ महिन्यांपेक्षा अधिक काळ खासदार उदयनराजे भोसले यांना विनाकारण प्रचंड त्रास सहन करावा लागला होता, असेही समर्थकांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना स्पष्ट केले. खोलात जाऊन चौकशी करणार : मुख्यमंत्रीलोणंद प्रकरणात खासदार उदयनराजे भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळला गेला असल्याने कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. या प्रकरणात उदयनराजे यांना दिलासा मिळावा, अशी मागणी केल्यानंतर खोलात जाऊन चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सुनील काटकर यांनी सांगितले.
षड्यंत्राची कहाणी म्हणे मुख्यमंत्र्यांच्या कानी !
By admin | Updated: May 5, 2017 22:56 IST