वाई : मांढरदेव ॲथलेटिक फाउंडेशनच्या खेळाडूंनी मांढरदेव घाटात गुंडेवाडी गावाजवळ पांडवगडाला लागलेला वणवा अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनी विझविला. त्यामुळे हजारो हेक्टर जंगल जळण्यापासून वाचले.
मांढरदेव ॲथलेटिक्स फाउंडेशनचे खेळाडू मैदानावर साडेचारला सरावाला आले. असता गुंडेवाडी गावाजवळ पांडवगडाला वणवा लागल्याचे दिसून आले. यावेळी प्रशिक्षक राजगुरू कोचळे यांनी खेळाडूंचा सराव थांबवत मैदानापासून जवळपास सात किलोमीटर अंतरावर धाव घेऊन पांडवगडावर जाऊन झाडांच्या फांद्या, डहाळेंच्या साह्याने वणवा विझविला.
वाई तालुक्यात पांडवगड हा एकमेव भाग वणव्यापासून संरक्षित राहिलेला भाग आहे. या पांडवगडावर मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती आहे. प्राणी, पक्ष्यांची अनेक दुर्मीळ प्रजाती तसेच साग, आंबे, फणस, जांभूळ, करवंद आणि अनेक प्रकारची रानझाडे पाहावयास मिळतात. या जंगलात भेकर, ससे, रानमांजरे, रानडुकरे, काळवीट, माकडे, मोर याचबरोबर अनेक प्राणी व पक्षी वास्तव्य करतात. शनिवारी दुपारी अज्ञात व्यक्तीने गुंडेवाडी गावाजवळ मांढरदेव वाई घाट रस्त्यात वणवा लावला. वणवा एवढा प्रचंड होता की आगीचे लोट व धूर जवळपास दहा-बारा किलोमीटरवरून स्पष्ट दिसत होते.
मैदानावर प्रशिक्षक राजगुरू कोचळे पोहोचल्यानंतर पांडवगडाला वणवा लागलेला दिसल्यानंतर जवळपास १६ खेळाडू दुचाकी व कारच्या साह्याने वणव्याजवळ पोहोचले व अडीच तास अथक प्रयत्नातून संपूर्ण वणवा विझविण्यात यशस्वी झाले.
अडीच तासांच्या अथक प्रयत्नातून वणवा पूर्णपणे विझल्यामुळे हजारो हेक्टर जंगल व प्राणी पक्ष्यांचा जीव वाचला. त्यामुळे खेळाडूंच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. तरी दोषीं व्यक्तीवर वनविभागाने कडक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
०४वाई
मांढरदेव ॲथलेटिक फाउंडेशनच्या खेळाडूंनी मांढरदेव घाटात गुंडेवाडी गावाजवळ पांडवगडाला लागलेला वणवा अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनी विझविला.