पाटण : तालुक्यातील अनेक गावे डोंगरात वसलेली असून, ग्रामस्थांना लागणारे शेतीचे उतारे व अन्य दाखल्यांसाठी विभागवार सजा व मंडलाधिकारी यांची निर्मिती केली गेली आहे. मात्र, हेच मंडलाधिकारी व तलाठी बऱ्याच वर्षांपासून पाटण प्रांत कार्यालयाभोवती आपली कार्यालये थाटून बसलेले असून, मोरगिरी, वनकुसवडे, मणदुरे, पाटण, मरळी विभागातील अनेक गावांना आपल्या कामासाठी पाटणला यावे लागत आहे.पाटण तालुक्यात एका तलाठ्याकडे पाच ते दहा गावांचा कार्यभार असल्याचे चित्र आहे. त्यापुढे जाऊन विचार केला तर तलाठ्यांवर नियंत्रण ठेवणारे सर्कल म्हणजेच मंडलाधिकारी यांच्यामागे प्रती मंडलाधिकारी २५ गावांचा कार्यभार आहे. एका सर्कलकडे पाच ते दहा तलाठ्यांचे नियंत्रण आहे. असे असताना अनेक मंडलाधिकारी पाटणमध्ये बसूनच कारभार पाहतात. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याला सातबारा, फेरफार किंवा खाते उतारा आणि इतर कागदपत्रांसंबंधी अडचणी भासल्यास मंडलाधिकारी शोध मोहीम राबवावी लागत आहे.प्रत्येक विभागात मंडलाधिकारी व तलाठी यांच्यासाठी सजा आहे. तेथेच दररोज जाऊन मंडलाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले पाहिजे. नव्याने झालेल्या प्रांत कार्यालयाच्या जागी मंडलाधिकारी व तलाठ्यांचे कोंडाळे होते. अनेक गावांचे तलाठी व सर्कल एकाच कार्यालयात बसून कारभार पाहत होते. त्यानंतर प्रांत कार्यालय झाले आणि मंडलाधिकारी आता आपली जागा सोडतील व नेमणुकीच्या ठिकाणी सजात जाऊन कामकाज करतील, अशी आशा होती. मात्र तसे झाले नाही. पाटणमध्ये अनेक मंडलाधिकाऱ्यांनी तळ ठोकलेला दिसतो.यामुळे सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.(प्रतिनिधी)पाटणचे प्रांताधिकारी संजीव जाधव आणि तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या कार्यालयानजीक असलेली मंडलाधिकारी व तलाठी यांची कार्यालये बंद करून संबंधित गावांत किंवा सजाच्या ठिकाणी जाऊन सर्कल व तलाठ्यांनी कामकाज सुरू करावे. अशा सूचना अधिकाऱ्यांनी द्याव्यात म्हणजे जनतेची गैरसोय होणार नाही.-चंद्रकांत भोईर, वनकुसवडे, ता. पाटण
प्रांत कार्यालयाभोवती तलाठ्यांचा पिंगा
By admin | Updated: February 10, 2015 00:25 IST