शिरवळ : पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीकडून चोरीचे सोने खरेदी करून विकणाऱ्या कारागिराला खंडाळा पोलिसांनी अटक केली आहे. सदाशिव जालिंदर कुंभार (वय ४४, रा. मोनिका विहार, लक्ष्मीनगर, फलटण, मूळ रा. चितळी, ता. खटाव) असे अटक केलेल्या सोने कारागिराचे नाव आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.खंडाळा तालुक्यातील वीर धरणाजवळ फिरायला आलेल्या शिरवळ येथील संजय शहा कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दिलीप गोरख माळी (वय २७), विजय वसंत चव्हाण (वय २९), लखन नाना जाधव (वय २५), रिझवान महंमद इलियास खान (वय २७, सर्व रा. संतोषी माता मार्ग, मलटण, ता. फलटण) यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. यावेळी चौकशी दरम्यान पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीशी फलटण शहर पोलीस ठाणेचा पोलीस हवालदार याचेही लागेबांधे असल्याचे समोर आले होते. उदय नारायण जाधव असे संबंधित पोलिसाचे नाव असून, त्याला तातडीने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी निलंबित केले आहे. दरम्यान, पोलिसांनी संबंधितांकडे कसून चौकशी केल्यानंतर संबंधित सोने कारागिराचे नाव निष्पन्न झाले.सोने कारागिर सदाशिव कुंभार याला अटक करून खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास खंडाळा पोलीस निरीक्षक अशोक शेळके हे करीत आहेत. (प्रतिनिधी)
फलटणच्या सोने कारागिराला अटक
By admin | Updated: July 16, 2014 22:54 IST