सातारा तालुक्यातील नागठाणे येथील प्रगतशील शेतकरी मनोहर साळुंखे यांनी २०१३ मध्ये जिल्ह्यात पहिल्यांदा या पेरू रोपांची लागवण केली होती. पुण्यातील एका कृषी प्रदर्शनात त्यांना या पेरूची माहिती मिळाली. त्यावेळी हॉलंडहून याची रोपे मागवली जायची. एकरी ४०० रोपे लावून साळुंखे यांनी ही अनोखा प्रयोग करायचं ठरवलं. दोन वर्षांनी रोपांना फळे लागली आणि त्यांना थेट अमेरिका, कुवेत आणि दुबई येथून मागणी येऊ लागली. उत्पादन घेतल्यापासूनच हे पेरू परदेशी जाऊ लागले. गतवर्षी कोविडमुळे निर्यातबंदी आली आणि १५० रुपये किलोचा पेरू अवघ्या चाळीस रुपयांनी स्थानिक बाजारपेठेत देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. आर्थिक स्थैर्य देण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साताऱ्याचे नाव पोहोचविण्यात या पेरूने मोठी भूमिका बजावली आहे.
पेरूची जात :
व्हीएनआर पीव्ही १ केजी
तैवान पिंक
फळाचे वजन : ७५० ग्रॅम ते दीड किलो
एकरी लागवड : ४०० ते ९०० रोपे
एकरी उत्पादन : पहिल्या बहाराला ७० ते ८० हजार, त्यानंतर सरासरी २ लाख
फळधारण कालावधी : लागवडीनंतर २ वर्षे
व्यापारी कार्यक्षेत्र : लोकल टू ग्लोबल
उत्पादन कुठं : नागठाणे, कटगूण, माण आणि खटाव
प्रयोगशील शेतकरी : १४७
अवलंबून छोटे विक्रेते : २८९
पहिली पेरू बाग : मनोहर साळुंखे, नागठाणे २०१३
पाण्याचा अंश अन् सेंद्रिय खत ठरवते चव!
साताऱ्याच्या बाजारपेठेत सध्या मोठ्या आकाराच्या या पेरूंची क्रेझ आहे. एका किलोत एक पेरू घरी नेणारे आणि सहकुटुंब तो खाण्याचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. अपवादात्मक परिस्थिती सोडली, तर हे पेरू चवीला आणि पौष्टिकतेला देशी पेरूइतकेच उत्तम आहेत. जमिनीतील पाण्याचा अंश वाढला, तर पेरूची चव सपक लागते. अर्थात उभ्या पावसात जर कोणी हा पेरू खाल्ला असेल, तर तो चवीला कमी गोड लागतो. याबरोबरच या पेरूची चव सेंद्रिय खतांवरही अवलंबून असते.
पेरूला थेट हस्तस्पर्श नाहीच!
कोविड काळात स्थानिक पातळीवर पेरू विक्री करण्याआधीपासूनच हे पेरू निर्यात करण्याची विशिष्ट पध्दत होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चवीबरोबरच मालाचे दिसणेही महत्त्वपूर्ण ठरते. म्हणूनच साळुंखे यांनी बेंगलोरहून पेरूसाठी फोम बॅग डिझाईन करून घेतली. विशिष्ट आकारात पेरू वाढले की त्यावर प्लास्टिकची पातळ पिशवी आणि त्यावर फोम बॅग लावली की हे पेरू सुरक्षित होतात. परिणामी शेतमजुरांचे हात या फळाला लागत नाहीत. दुसरं म्हणजे झाडांवर औषध फवारणी केली तरीही त्याचा परिणाम फळावर होत नाही.
कोट :
लॉकडाऊन लागल्यापासून आम्हाला या मोठ्या पेरूंच्या बागा सातारा जिल्ह्यात गवसल्या. ग्राहक आधी पेरूचा आकार बघून थांबतो. मग चौकशी करून एकच नग नेतो. घरी हा पेरू खाल्ल्यानंतर नियमितपणे पेरू नेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय.
- विक्रेते, रहिमतपूर
परदेशात निर्यात करण्याच्या क्षमतेचा असणारा हा पेरू आता स्थानिक बाजारातही चांगलाच रूजला आहे. निर्यातबंदी असल्याने आम्ही गतवर्षी हे पेरू भागात वाटले. त्यानंतर छोटे व्यापारी येऊन पेरू तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी विकुूलागले. त्यामुळे त्यांनाही आर्थिक स्थैर्य मिळाले.
- मनोहर साळुंखे, उत्पादक शेतकरी, नागठाणे