सातारा : ‘पर्ल्स’ कार्यालयाच्या बाहेर ठेवीदारांच्या तक्रारी घेणाऱ्या काही कार्यकर्त्याना एजंटांनी दमबाजी केली. हे एजंट दमबाजी करून येथून पळून गेल्यामुळे त्यांची नावे समजू शकली नाहीत. संबंधित दमबाजी करणारे येथे आल्यानंतर आम्ही एजंट असल्याचे सांगत होते. दरम्यान, मंगळवारी अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासकडे पन्नास तक्रारी दाखल झाल्या असून गेल्या तीन दिवसांत त्यांच्याकडे पाचशे तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारदारांच्या ठेवींची मुदत संपली आहे.‘पर्ल्स’ कंपनीने साताऱ्यातील सात हजारांहून अधिक ठेकेदारांना शेकडो कोटींना गंडवले आहे. यापैकी बहुतांशी ठेवीदारांची मुदतठेवीची मुदत संपल्यामुळे त्यांच्या हाती रक्कम पडलेली नाही. परिणामी ते हतबल झाले आहेत. गेले पंधरा दिवस पर्ल्सच्या संदर्भात बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, ठेवीदारांची संख्या आणि नुकसानीचा आकडा लक्षात घेता अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, तात्या सावंत, सर्जेराव पाटील, मिलींद कासार, चाँदगणी आत्तार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘पर्ल्स ठेवीदार बचाव कृती समिती’ स्थापन केली असून त्यांच्याकडे तक्रारीचा ओढा वाढू लागला आहे.मंगळवारी काही ठेवीदार आणि ‘अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यास’चे प्रतिनिधी आणि ठेवीदार असलेले खंडाळा तालुक्यातील वाण्याचीवाडी गणेश पाटणे, सातारा येथील माजी सैनिक चंद्रकांत घाडगे ‘पर्ल्स’च्या कार्यालयाबाहेर ठेवीदारांच्या तक्रारी घेत होते. येथे काही एजंट आले. त्यांनी दमबाजी केली आणि ते पळून गेले. दरम्यान, या एजंटांनी शेजारीच असलेल्या झेरॉक्स विक्रेत्याने ओळखले असून त्यांची नावे लवकरच समणार आहेत. यामध्ये कोण-कोण गुंतले आहेत, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी) एजंटांनी मोबाईलहिसकावून घेतला...‘पर्ल्स’च्या कार्यालयाबाहेर ठेवीदारांच्या तक्रारी लिहून घेण्याची कार्यवाही सुरू असताना येथे दोन एजंट आले. त्यांनी पाटणे आणि घाडगे यांना दमबाजी केली. याचवेळी पाटणे यांच्या हातात असणारा मोबाईल एजंटांनी हिसकावून घेतला. मात्र, पाटणे यांनी जनआंदोलनाचे नाव सांगताच एजंट मोबाईल टाकून पळून गेले.
‘पर्ल्स’च्या दोन एजंटांची दमबाजी
By admin | Updated: November 11, 2014 23:24 IST